Mumbai News : श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. हा प्रकल्प पुढील तीन -साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
या संदर्भात आज मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. (Pratap Sarnaik) या बैठकीला छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर,आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी यांच्यासह धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी,तुळजापूर (Tuljapur) हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे 1 ते 1.5 कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख-सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1865 कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला.
या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिल्या. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अष्टभुजा प्रतिमेला विरोध..
श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत 108 फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री.तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे.
त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असेही जिल्हाधिकारी धाराशिव यांना सूचित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.