
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी सव्वा ते दीड कोटी भाविक येतात. या भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने 1866 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यातून भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे केली जाणार आहेत. विकासकामे 3 वर्षांत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षांत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या 3 कोटींवर नेण्याचा प्रयत्न असेल. त्यातून मग होईल तुळजापूर आणि परिसरातील गावांचा आर्थिक कायापालट!
तुळजापूरचा आर्थिक कायापालट कसा होणार हे समजून घेऊ. 'मित्र'चे उपाध्यक्ष, तुळजापूरचे भाजपचे (BJP) आमदार राणाजगजितसिंह पाटील सांगतात, की या आराखजड्यातील विकासकामे भाविकांना केंद्रस्थानी ठेवून केली जातील. भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, याकडे लक्ष देण्यात येणार आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे होईल असे की, भाविकांना समाधान, आनंद मिळेल आणि तो पुन्हा पुन्हा दर्शनासाठी येईल.
तुळजापूर-अक्कलकोट-नळदुर्ग-तेर-येडशी असे सर्किट तयार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन आणि काम सुरू करण्यात आले आहे. अक्कलकोटला स्वामी समर्थांचे मंदिर आहे. स्वामी समर्थांचे दर्शन झाल्यानंतर भाविक तुळजापूरला येतात. नळदुर्ग ते तुळजापूर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. नळदुर्ग येथे बसवसृष्टी आणि वसंतराव नाईक यांच्या स्मारकाची उभारणी केली जाणार आहे. तुळजापूर ते तेर हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. येडशी येथे अभयारण्य आहे. तेथे जंगल सफारीची सोय केली जाणार आहे.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल आणि तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येईल. त्यामुळे देशभरातील भाविकांची सोय होणार आहे. सोलापूर-अक्कलकोट-पंढरपूर-तुळजापूर असेही एक सर्किट त्यानंतर तयार होईल. धार्मिक आस्थेचा हा सर्किट पर्यटन म्हणूनही विकसित होणार आहे. त्याद्वारे वर्षाकाठी येणाऱ्या भाविकांची संख्या 3 कोटींवर जाईल, असा विश्वास आमदार पाटील यांना आहे. या 3 कोटी भाविकांपैकी एक टक्का भाविकांनीही नळदुर्ग, तेर, येडशीचे पर्यटन केले तर या परिसराचा कायापालट होणार आहे,
तेर ही संत गोरोबाकाकांची नगरी आहे. तेथे एक एकरवर पर्यटकांसाठी लाइव्ह उत्खनन पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. तेरचे पुराणवस्तू संग्रहालय, त्रिविक्रमाचे मंदिर प्रसिद्ध आहे. भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे केली तर पर्यटनाला, विविध व्यवसाय, उद्योगांना चालना मिळणार आहे.
धार्मिक पर्यटन म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता असलेला हा भाग. त्यादृष्टीने सरकारकडून पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुळजाभवानी मातेच्याही तीर्थक्षेत्राचा विकास केला जाणार आहे. अत्याधनुक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना तलावर देत असल्याचे शिल्प उभारण्यात येणार आहे. या शिल्पाचा पाया तीनमजली असून शिल्प १३ मजली असेल, असे आमदार पाटील यांनी सांगितले. भाविकांसाठी भक्तनिवास, वाहनतळासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील. संबंधित क्षेत्रांतील तज्ञ, सल्लागारांशी चर्चा केल्यानंतर ही कामे पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. घाटशीळ, सोलापूर महामार्ग, हडको आदी ठिकाणी भक्तनिवास, प्रसादालयांची उभारणी केली जाणार आहे. भक्तनिवास वातानुकूलित असतील.
विविध ठिकाणी वाहनतळांची उभारणी केली जाणार आहे. वृंदावन गार्डनप्रमाणे उद्यानांची उभारणी केली जाणार आहे. ज्येष्ठ, दिव्यांग भाविकांसाठी लिफ्ट, ट्रॅव्हलेटरची सुविधा असेल. तीन वर्षांत ही कामे पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत रेल्वेमार्गाचेही काम पूर्ण होणार आहे. ही विकासकामे झाली आणि भाविकांची संख्या वाढली तर तुळजापूर आणि परिसरातील व्यवसाय, उद्योगांनाही चालना मिळेल. अम्युझमेंट पार्क, हॉटेल व्यवसायासाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष विकास आराखड्यातील कामांकडे लागले आहे.
आराखड्यानुसार होणार 'या' सोयी सुविधा
मंदिराचा इतिहास, संस्कृती,वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे. गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, भाविकांच्या संख्येचे नियमन, रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा, शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार, विश्रांती स्थळे, भाविक सुविधा केंद्राची उभारणी, वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा, सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत.
विकास आराखड्याला 'या' कारणामुळे होता नागरिकांचा विरोध
विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर नागरिकांनी आक्षेप घेतला होता. यावरूनच काही पुजारी आक्रमक झाले होते. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा, अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी होती. दर्शन मंडपाची जागा बदलल्यामुळे काही व्यापाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार होते, त्यामुळे या आराखड्याला त्यांनी कडाडून विरोध केला होता. तुळजापूर बंद करून या आराखड्याला विरोध केल्यामुळे तो रखडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु व्यापारी, स्थानिक नागरिकांच्या मागणीनूसार विकास आराखड्यात बदल करण्यात आले आहेत. सर्वांचे समाधान झाल्यानंतर आता या विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैक पटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात 30 टक्के तरतूद केवळ भू संपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, जमिनीचा चांगला मोबदला देण्यात येणार असून आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा प्रयत्न असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.