Dhananjay Deshmukh Booked Beed : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख याच्या विरोधात बीडमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
समाधान खिंडकर याने दिलेल्या तक्रारीनुसार, धनंजय देशमुख याने अंगरक्षकाचे रिव्हॉल्व्हर काढून त्यांच्या डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच समाधान खिंडकर याच्याविरोधात त्याचा सख्खा भाऊ दादा खिंडकर याने धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता समाधान खिंडकर याने थेट धनंजय देशमुख याच्याविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांत (Police) धाव घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
समाधान खिंडकर (रा. बेलवाडी, Beed) याने दिलेल्या तक्रारीनुसार, 30 मे रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता ते मित्र दीपक मनेरी आणि अन्य एक मित्र, असे तिघे जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी धनंजय देशमुख हा देखील काही सहकाऱ्यांसह तिथे उपस्थित होता. त्याच्यासोबत दोन ते तीन अनोळखी व्यक्ती तसेच रिल स्टार रवीराज साबळे हेही असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, रवीराज साबळे याला मोबाईलमधील काही माहिती दाखवत असताना धनंजय देशमुख याच्या अंगरक्षकाने मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल का घेतला, अशी विचारणा केल्यानंतर धनंजय देशमुख तिथे आला आणि वाद सुरू झाला, असा दावा फिर्यादीने केला आहे.
समाधान खिंडकर याने तक्रारीत म्हटले आहे की, यावेळी धनंजय देशमुख याने, माझ्याकडे एवढा पैसा आहे की, तुला सहज संपवू शकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर अंगरक्षकाच्या कंबरेचे रिव्हॉल्व्हर काढून ते आपल्या डोक्याला लावले अन् तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोपही त्याने केला आहे. याचवेळी देशमुख याच्यासोबत असलेल्या काही व्यक्तींनी शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी समाधान खिंडकर याच्याविरोधात त्याचा भाऊ दादा खिंडकर याने देखील तक्रार दिली होती. धनंजय देशमुख याच्यासोबत राहू नको, संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देऊ नकोस आणि प्रकरण मिटवून घे, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाची धमकी समाधान खिंडकर याने दिल्याचा आरोप दादा खिंडकर याने केला होता. दादा खिंडकर अन् धनंजय देशमुख याचे साठूचे नाते लागते.
सलग दाखल झालेल्या तक्रारींमुळे देशमुख आणि खिंडकर कुटुंबातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचे दिसत आहे. मात्र, धनंजय देशमुख याच्याविरोधात थेट शस्त्राचा धाक दाखवून धमकी दिल्याचा आरोप आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने बीडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.