Munde-Durani Parbhani
Munde-Durani Parbhani Sarkarnama
मराठवाडा

पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे दोन जिल्ह्याचा कारभार; परभणीचीही जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

परभणी : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर ते तुरूगांत आहेत. (Parbhani) विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही परिस्थिती मलिकांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतली. (Dhnanjay Munde) परंतु मलिक यांच्यावरील कारवाई आणि तपास पुर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या मंत्रालयाचा आणि संघटनात्मक जबाबदारीचा पदभार इतरांवर सोपवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. (Marathwada)

नवाब मलिक यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. ती आता राज्याचे सामाजिक न्याय तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल काढण्यात आला. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे आता दोन जिल्ह्याचा कारभार आला आहे. मुंडे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर परभणीत त्यांचे स्वागत करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष बाबाजाणी दुर्राणी, विजय भांबळे, राजेश विटेकर व भरत घनदाट यांनी मुंडे यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागतही केले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीत अंतर्गत कुरबुरी वाढल्या होत्या. जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेतील आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला होता.

दरम्यान, दुर्राणी पक्ष सोडून काॅंग्रेसमध्ये जाणार अशा वावड्या देखील उठल्या होत्या. परंतु आता हे प्रकरण बऱ्यापैकी शांत झाले असून दुर्राणी सक्रीय झाल्याचे चित्र आहे. मलिक पालकमंत्री असलेल्या परभणीची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे आल्याने जिल्ह्यातील अजित पवार समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये अधून मधून संघर्ष झडत असतो. तसा तो भाजपशीही होत असतो. एका स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवसांपुर्वी भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे विजय भांबळे समर्थकांमध्ये देखील चांगलाच राडा झाला होता. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय भांबळे यांच्या थोडक्यात झालेला पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

त्यामुळे संघटनात्मक बांधणीच्या दृष्टाने देखील अजित पवारांचे या जिल्ह्यावर बारीक लक्ष असते. धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच परभणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. आता पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे पक्षांतर्गत कुरबुरी रोखून विरोधकांना कसे नामोहरम करतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT