Dhananjay Munde, Devendra Fadanvis & Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Beed Politics: बीडच्या राजकारणात मोठा भूकंप,धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार? अजितदादांच्या सहा सभांना दांडी, फडणवीसांच्या कार्यक्रमाला हजेरी

Dhananjay Munde With CM Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सहा सभांना बायबाय करत गैरहजर राहणारे धनंजय मुंडे देवाभाऊंच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

Jagdish Pansare

Marathwada Politics : गहिनीनाथ गडावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत वामनभाऊ यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याला हजेरी लावली. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सहा सभांना बायबाय करत गैरहजर राहणारे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) देवाभाऊंच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

गेल्या आठवड्यात बीडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भुमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला आपण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकणार नाही, त्यामुळे कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून आणि अजित पवार यांनीही आपल्या भाषणातून स्पष्ट केले होते. मुळात या दोघांवरही हे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली याचाच अर्थ काही तरी बिनसलंय, काही चांगल सुरू नाहीये, असाच लावला जात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभांना दांडी मारणारे धनंजय मुडे गहिनीनाथ गडावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला मात्र आवर्जून हजेरी लावतात, याबद्दल आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

बीड जिल्ह्यातील बदलले राजकारण, धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाला बसलेला धक्का, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधामुळे गमवावे लागलेले मंत्रिपद यामुळे धनंजय मुंडे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात बॅकफुटवर आहेत.

2019 आणि आताच्या 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग दोनवेळा निवडून आलेल्या धनंजय मुंडे यांना परळी नगरपालिकेची सत्ता राखण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या म्हणजेच भाजपच्या कुबड्या घ्याव्या लागल्या यातच सगळं आलं, असेही बोलले जाते. परळी नगरपालिकेत सत्ता राखल्यानंतर धनंजय मुंडे यांचे जिल्ह्याच्या राजकारणात कमबॅक होत आहे, असे वाटत असताना अजित पवारांनी मात्र मुंडे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ दिल्याचे चित्र आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून नेमले होते, तरी त्यांना परळी आणि गंगाखेड पुरतेच मर्यादित ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादीच्याच आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या सभा आम्हाला नको, अशी भूमिका घेतली होती. बीड नगरपालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीची सुत्रंही अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याऐवजी पहिल्यांदाच आमदार झालेल्या गेवराईच्या विजयसिंह पंडित यांच्या हाती दिली. मुंडे यांचे पक्षाकडूनच खच्चीकरण सुरू असल्याची चर्चा यामुळे होताना दिसते.

अजित पवारांसोबत व्यासपीठावर येणे धनंजय मुंडे टाळत आहेत का? असा प्रश्न त्यांच्या सातत्याने गैरहजर राहण्याने उपस्थितीत केला जात आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांची भाजपशी जवळीक वाढू लागली आहे, असेही दिसते. संपूर्ण राज्यात कुठे झाली नाही ती भाजपसोबतची युती परळी नगरपालिकेत झाली. पंकजा मुंडे यांनीही नांदेड जिल्ह्यातील माळीकोळी येथे झालेल्या कार्यक्रमात 'मी परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकली' असे जाहीर करत आपल्यात आता वाद नाहीत हे स्पष्ट केले.

भाऊ अचडणीत असताना आपण मनात कुठलाही आकस न ठेवता भावाच्या जखमांवर मलम लावण्याचे काम केले, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. एकूणच मुंडे-बहीण भाऊ एकत्र येणे आणि त्यांच्यातील वाद संपुष्टात येणे यामागे नेमकं कोण आहे? याचे कोडे आता कुठे उलगडू लागले आहे. वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे मोठा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे एकत्र आले होते.

फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचे कौतुक करतानाच आमचे धनुभाऊ असा उल्लेख केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. अजित पवारांपासून अंतर राखून असणारे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र अधिक जवळ जात आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर दोनवेळा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील वापसीची चर्चा झाली. मात्र, ती फक्त चर्चाच ठरली.

बीड जिल्ह्यातील पक्षांतर्गत विरोधकांना दिले जाणारे बळ, मंत्रिमंडळात परत घेण्यात होणारी टाळाटाळ यामुळे धनंजय मुंडे नाराज असल्याच्याही चर्चा आहे. अशावेळी त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत वाढणारी जवळीक भविष्यातील मोठ्या राजकारणांची नांदी तर नाही ना?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT