Marathwada Politics News : माजी मंत्री तथा परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे सध्या राजकीय संघर्षातून मार्गक्रमण करत आहेत. विविध आरोप, चौकशा आणि टार्गेट केले जात असल्याने मुंडे हे सावधपणे पावलं उचलंत आहेत. नुकताच धनंजय मुंडे यांना दिलासा देणारा निर्णय आला. त्यानंतर त्यांचे समर्थक सोशल मिडियावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्याचा दाखला देत मुंडे समर्थक विरोधकांना भिडले असले तरी मुंडे यांनी मात्र आपल्या समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधातील दोन तक्रारी राज्याच्या लोकायुक्तांनी निकाली काढल्या. उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत 245 कोटी रुपयांच्या कृषी साहित्य खरेदीची तक्रार आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशीच करण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत लोकायुक्तांनी ही दोन्ही प्रकरणं निकाली काढली आहेत. या निर्णयाने मुंडे यांना दिलासा मिळताच त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर पोस्ट करत विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला.
'प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये, हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अशा भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा, असे म्हणत समर्थकांना आवाहन केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेली निर्घृण हत्या प्रकरण, त्यात धनंजय मुंडे यांचा उजवा हात अशी ओळख असलेल्या वाल्मिक कराड याचा मुख्य आरोपी म्हणून सहभाग, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचा अहवाल, त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी निर्माण केलेले संशयाचे जाळे या व अशा अनेक प्रकरणांमुळे मुंडेंना घेरण्यात आले आहे. वर्षभरापासून धनंजय मुंडे राजकीय संकटातून जात आहेत.
या सगळ्या घटना, घडामोडी, आरोप-प्रत्यारोपांमुळे धनंजय मुंडे यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्याविरोधातील दोन तक्रारी राज्याच्या लोकायुक्तांनी निकाली काढल्याने त्यांना दिलासा मिळाला. कृषी साहित्य खरेदी प्रकरणात मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ते केले होते.
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना दिलासा देताना कृषी साहित्याची खरेदी व वितरणाचा निर्णय वैध ठरवला होता. तसेच मुंडेंनी संबंधित कृषी क्षेत्राशी निगडित सर्वसाहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवल्याचं उच्च न्यायालयाने म्हटले होते. विशेष बाब म्हणजे धनंजय मुंडेंविरोधात त्यांच्या कृषिमंत्री असतानाच्या काळात झालेल्या खरेदी वितरणाच्या निर्णयांवर दाखल करण्यात आलेली याचिका बनावट ठरवली होती.
यावर याचिकाकर्ते तुषार पडगिलवारवर यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. यानंतर दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. पण न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत लोकायुक्तांनी कृषी साहित्य खरेदीची तक्रार निकाली काढली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.