Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

आम्ही बांधावर होतो, तेव्हा त्या अमेरिकेत होत्या : धनंजय यांची पंकजांवर टीका

माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडून जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुण्याला (Pune) गेले आहेत, अशी टीका केली होती. त्याला धनंजय यांनी उत्तर दिले.

सरकारनामा ब्यूरो

परळी : गेले १५ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परळी (Parali) तालुक्यातील वाण नदी काठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसह, घरे, जनावरे व अन्य नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी बीड (Beed) जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी रविवारी (ता.३ ऑक्टोबर) केली.

"निसर्ग कोपला असला तरी, कुणाचेही घर, संसार उघड्यावर पडू देणार नाही, शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल." असे आश्वासन मंत्री मुंडे यांनी वाणटाकळी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना दिले. तसेच, आम्ही तीन वेळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली तेव्हा पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या अमेरिकेत होत्या असा टोलाही पंकजा यांना लगावला.

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण टाकळी व नागापूर गाव परिसरात शेतीसह अन्य मोठे नुकसान झाले आहे. याकाळात अनेकांना रात्री जीव मुठीत धरून बसावे लागले होते. मागील २५ वर्षांच्या काळात इतका पाऊस कधीच झाला नव्हता. वाण नदीने विक्राळ स्वरूप धारण करत, एका पात्राचे तीन पात्र केले. पाणी, दगड गोटे शेतांमध्ये शिरले आहेत. नुकसान पाहताना शेत कोणते आणि नदी पात्र कोणते? असा सवाल मनात येत आहे. त्यामुळे झालेले नुकसान हे पंचनामे करण्यापलीकडचे आहे. असे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुंडे म्हणाले.

त्यांनी रविवारी (ता.३ऑक्टोबर) स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तालुक्यातील वाण टाकळी, नागापूर, लाडझरी व नागदरा आदी गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान मुंडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, अवघड रस्त्यावरून शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी केंद्रे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, कृषी अधिकारी सोनवणे, यांसह नागापूरचे सरपंच मोहनराव सोळंके, अॅड विष्णुपंत सोळंके, भागवत मुंडे, दौनापूरचे सरपंच बळीराम आघाव, माऊली आघाव, माणिक मुंडे, प्रवीण सोळंके, बलराज सोळंके यांसह स्थानिक पदाधिकारी, कृषी, विमा कंपनी तसेच रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडेंवर धनंजय यांची टीका...

काही दिवसापुर्वी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडून जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुण्याला गेले आहेत. अशी टीका केली होती. यास उत्तर देतांना धनंजय मुंडे म्हणाले, "आम्ही तीनदा जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली तेव्हा त्या अमेरिकेत होत्या, त्यामुळे त्यांना पुरेशी माहिती नसावी" असा टोला नाव न घेता पंकजा मुंडेंना त्यांनी लगावला.

जिल्ह्यात जून पासून आजपर्यंत ११ ते १२ वेळा अतिवृष्टी झाली, मागील १५ ते २० दिवसात चार वेळा ढगफुटी सारखा पाऊस झाला. या काळात आम्ही तीन वेळा सर्व बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या परिस्थितीचे गांभीर्य सांगितले व जिल्ह्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज व सरसकट मदत देण्याची मागणी केली आहे.

आज चौथ्यांदा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसून त्यांना धीर देण्याचे काम करत आहोत, सोबतच राज्य सरकार म्हणून सरसकट मदत देण्याबाबतच्या हालचाली राज्य स्तरावर सुरू आहेत. मात्र, या संपूर्ण कालावधीत 'त्या' अमेरिकेत होत्या, दोन दिवस आल्या आणि परत निघून गेल्या. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची पुरेशी माहिती नसावी, असा टोला मुंडे यांनी पंकजा यांचे नाव न घेता लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT