Sunil Tatkare, dhananjay munde News Beed sarkarnama
मराठवाडा

Sunil Tatkare News : सुनील तटकरे म्हणतात, धनंजय मुंडे यांचे पक्षातील स्थान अबाधित!

NCP State President affirms that Dhananjay Munde holds a firm and undisputed position within the party : बीड जिल्ह्यातही दोन्ही पक्ष कायम एकमेकांच्या विरोधात लढलेले असल्याने स्वतंत्र लढावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे ऐकूनच शेवटी निर्णय घेतला जाईल.

Jagdish Pansare

NCP News : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील स्थान हे काल, आज आणि उद्याही अबाधित राहील. पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे, भविष्यात पक्ष नेतृत्व त्यांच्याबद्दल योग्य निर्णय घेईल, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे सांगितले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार नव परिवर्तनाचा यात्रेनिमित्त सुनील तटकरे (Sunil Tatkare) बीड दौऱ्यावर होते. या यात्रेमुळे पक्षात ताकदवान नेत्यांचे प्रवेश होत आहेत. निवडणुकांबाबत महायुतीच्या समन्वयकांच्या बैठका झाल्या असून स्थानिक नेत्यांचीही मते जाणून घेतली जात आहेत. युती अभेद्य ठेवत आगामी निवडणुकीच्या लढती मात्र स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार असतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीबाबत महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वयकांच्या पाच बैठकीत निवडणूक एकत्रच लढवावी, असा सूर आहे. तथापि, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा मतदार संघांत परिस्थिती वेगवेगळी आहे. (Beed News) बीड जिल्ह्यातही दोन्ही पक्ष कायम एकमेकांच्या विरोधात लढलेले असल्याने स्वतंत्र लढावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाचे म्हणणे ऐकूनच शेवटी निर्णय घेतला जाईल. पण, महायुती अभेद्य असेल, असे तटकरे म्हणाले.

बीड जिल्हा दौऱ्यावर असल्याने सहाजिकच गेल्या काही महिन्यापासून वादात सापडलेले आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याच्याशी असलेल्या संबंधामुळे मंत्री पद गमावावे लागलेल्या धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात तटकरे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांचे पक्षातील स्थान अढळ आहे, अबाधित आहे. काल, आज आणि उद्याही ते अबाधितच राहील, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. त्यांच्याबद्दल पक्ष योग्यवेळी निर्णय घेईल, असे सांगत धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील कमबॅकचे संकेतही त्यांनी दिल्याचे बोलले जाते.

धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असतानाच तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. रोहित पवारांना अकाली वृद्धत्व आल्याने ते बालिश बुद्धीसारखे वक्तव्य करत आहेत. अगोदर त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, असा सल्लाही तटकरे यांनी त्यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिला. तर संजय राऊत यांना रोज वेगवेगळी स्वप्न पडतात. नंतर ते भोंगा लावून सांगतात, आम्ही त्यांचे गांभीर्याने घेत नाही, अशी खिल्लीही तटकरे यांनी उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT