Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

धनंजय मुंडेंनी बांधावरूनच लावला सचिवांना फोन अन्‌ म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

अंबाजोगाई : अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अंबाजोगाई तालुक्यातील शेतीच्या बांधावरून थेट राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना फोन लावला. यावेळी त्यांनी बीड (Beed) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. मागील दोन वेळ मदत देताना बीडला वगळण्यात आले होते. आता सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे बीडमधील शेतकऱ्यांना पीक विमा आणि सरकारी मदत मिळावी, अशी मागणी केली. (Dhananjay Munde made a phone call to Relief & Rehabilitation Secretary From farm)

दिवाळीचा सण असूनही आज सलग तिसऱ्या दिवशी धनंजय मुंडे शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला थेट बांधावर जाऊन पोचले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसर तसेच चोपनवाडी, पिंप्री, पट्टीवडगाव या भागात पावसाने झालेल्या शेती नुकसानीची मुंडे यांनी आज पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.

मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव गुप्ता यांंना त्यांनी फोनवरून सांगितले की, मागील ४ ते ८ दिवसांत बीड जिल्ह्यात झालेले पावसाचे प्रमाण हे अतिवृष्टीच्या निकषांच्या कैक पटीने अधिक आहे. मागील दोन वेळा राज्य सरकारने शेतकऱ्यांना जी मदत दिली, त्यात बीड जिल्ह्याला वगळण्यात आले होते. मात्र, आताचे नुकसान पाहता कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान व पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, कृषी विभाग व विमा कंपनीला योग्य ते आदेश देऊन तातडीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची कार्यवाही करावी, असे मुंडे या वेळी सांगितले.

राज्य सरकार स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नुकसानीचा अहवाल पाहूनच त्यानुसार कार्यवाही करत असते, त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शेती पिकांचे झालेले नुकसान पाहून व माणुसकी डोळ्यासमोर ठेऊन पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. नुकसानीचे अहवाल तात्काळ शासनास सादर करावेत, अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.

या वेळी माजी आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, शिवाजी सिरसाट, तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे तसेच तहसीलदार विपीन पाटील, संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांसह आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT