Maharashtra Politics News : आमदार धनंजय मुंडे यांनी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा सुरू असताना आणि राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली पाहता धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट त्यांच्यासाठी दिवाळी गिफ्ट ठरणार का? याकडे मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यात यंदा दुष्काळ पडला आहे. शेतकरी संकटात सापडला असताना महायुती सरकारने 5000 रुपये अग्रीम मदत देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आदेशही दिले. त्याप्रमाणे सरकार मधील बहुतांश मंत्री हे दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा घरी गेल्याचे दिसून आले. स्वतः फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे इतर मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले.
दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे रुग्णालयात त्यांच्या भेटीसाठी गेले होते.
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना आज आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. परळी मतदारसंघासह मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यात यंदा निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत नेमकी आणखी काय चर्चा झाली? याबद्दल कुजबूज सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील वापसीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळामध्ये धनंजय मुंडे हे देखील होते. त्यामुळे या चर्चांना अधिक उधान आले होते.
अशातच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने पुन्हा या चर्चेला सुरुवात झाली आहे. धनंजय मुंडे यांनी मात्र मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, पावसाअभावी शेतीचे झालेले नुकसान आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे म्हटले आहे.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त मदत करावी, अशी आग्रही मागणी मुंडे यांनी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ आर्थिक मदतीने संपणार का? आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेत त्यांची दिवाळी मुख्यमंत्री गोड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.