Basavaraj Patil : 'शोभा पवार महायुतीच्याच', आमचाच एक उमेदवार बिनविरोध निवडून आला, आमदार बसवराज पाटील यांचा दावा!

Latur DCC Bank Election: शोभा पवार यांच्या बिनविरोध निवडीवरून बसवराज पाटील यांनी त्या महायुतीच्याच उमेदवार असल्याचा दावा केला. अभिमन्यू पवारांच्या भूमिकेमुळे लातूर जिल्हा बँक निवडणुकीतील संभ्रम वाढला आहे.
Basavaraj Patil claims Shobha Pawar’s unopposed victory belongs to Mahayuti
Basavaraj Patil claims Shobha Pawar’s unopposed victory belongs to MahayutiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Latur DCC Bank News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये फुट पडल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या सत्तेत सहकार मंत्री असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेत युतीला धक्का दिला. त्यासोबतच भाजपचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही काँग्रेसच्या मदतीने आपल्या पत्नी शोभा पवार यांना बिनविरोध निवडून आणत सोयीचे राजकारण केल्याचा आरोप केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये उभी फूट पडल्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे पारडे मजबूत असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजपचे आमदार रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, माजी आमदार विनायक पाटील व इतरांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून काँग्रेसला आव्हान देण्याची रणनीती आखली आहे.

दरम्यान भाजपचे आमदार बसवराज पाटील यांनी महायुती फूट पडलेली नसून आमदार अभिमन्यू पवार हे महायुतीचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवड झालेल्या पत्नी शोभा पवार या महायुतीच्या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालक असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

Basavaraj Patil claims Shobha Pawar’s unopposed victory belongs to Mahayuti
Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार सकारात्मक? म्हणाल्या,'जशी वेळ येईल..'

"अभिमन्यू पवार हे काँग्रेस किंवा त्यांच्या पॅनल सोबत आहेत असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये, त्यांनी आपल्या पत्नीची उमेदवारी न्यायालयात जाऊन आणलेली आहे. उमेदवारी कायम राहिल्यानंतर समोरच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांचा बिनविरोध विजय झाला.अभिमन्यू पवार हे औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. ते आमचेच आहेत", त्यामुळे त्यांच्या पत्नीचा बिनविरोध विजय हा महायुतीचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पहिला विजय आहे याचा पुनरुच्चार बसवराज पाटील यांनी केला.

बसवराज पाटील यांच्या या दाव्याने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपच्या परिवर्तन पॅनलमध्ये कुठेही प्रचार करताना अभिमन्यू पवार दिसले नाहीत. शोभा पवार यांना बिनविरोध संचालक केल्यानंतर ते काँग्रेस सोबतही दिसले नाहीत. मग बसवराज पाटील यांनी केलेला दावा कितपत खरा मानायचा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Basavaraj Patil claims Shobha Pawar’s unopposed victory belongs to Mahayuti
Sanjay Jadhav : ऐन दिवाळीत परभणीत खासदार- आमदारांमध्ये संघर्ष; कारखान्यावर शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाने वातावरण तापले!

मतदार पळवा-पळवीच्या प्रकारानंतर काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे परिवर्तन पॅनलमध्ये भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनीच वेगळी भूमिका घेतल्यामुळे ते महायुतीचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यातून विस्तवही जात नाही हे काही आता लपून राहिलेले नाही. बसवराज पाटील यांनी ते महायुतीचेच असल्याचा केलेला दावा हा केवळ मनाची समजूत काढण्याचा प्रकार असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.