Marathwada Graduate Constituency : मराठवाड्याच्या मातीला हात लावून त्या माती खाली काय दडलंय? हे ओळखणारे मोजके नेते या भागात आहेत. सतीश चव्हाण हे त्यापैकीच एक आहेत, कोणत्या तालुक्यात माती खाली काय चाललंय हे ते चांगलं ओळखतात. माझी आणि त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची सच्ची साथ आहे. लांबलचक, पसरट मांडणी न करता थेट मुद्द्याला हात घालत पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडणे आणि ते सोडवणे याचा मी साक्षीदार आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे कौतुक केले.
२००८ मध्ये सतीश चव्हाण पहिल्यांदा विधानपरिषदेत आमदार म्हणून गेले. मी २०१० मध्ये गेलो, २०१३ मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतांना गोपीनाथ मुंडेसाहेब समोर होते. तेव्हा सतीश चव्हाण यांनी माझ्या उजव्या खांद्यावर हात ठेवत मला धीर दिला, याची आठवणही धनंजय मुंडे यांनी परळी येथील पदवीधरांच्या मेळाव्यात सांगितली.
सतीश चव्हाण यांनी अर्धी निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशीच जिंकली होती. आता पन्नास टक्के काम तुम्हाला करायचे आहे. परळी मतदारसंघातील शंभर टक्के पहिल्या पसंतीचे मतदान हे सतीश चव्हाण यांना मिळेल एवढी तुमची ताकद आहे. सतीश चव्हाण यांच काम टेस्ट क्रिकेट सारखं नाही, सभागृहात ते लांबलचक भाषण करत नाही, मुद्देसूद बोलणं आणि मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले याचा मी साक्षीदार आहे, याचा पुनरुच्चार मुंडे यांनी आपल्या भाषणात केला.
२०१४ ते २०१९ हा काळ संघर्षाचा काळ होता. त्या परिस्थित सभागृहात, सभागृहाबाहेर मी लढत असताना सतीश चव्हाण यांनी मला ताकदीने साथ दिली. पाचवेळा महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा निघाल्या त्यावेळी सतीश चव्हाण आमच्यासोबत होते. आम्ही सतीश चव्हाण यांच्याशी चर्चा करायचो. मराठवाड्याच्या मातीवर हात ठेवला तर कुठल्या तालुक्यात माती खाली काय चाललंय हे ओळखणारे सतीश चव्हाण आहेत.
परळी मतदारसंघात सात हजार पदवीधरांचे मतदान आहे. ९५ टक्के मतं पहिल्या पसंतीची सतीश चव्हाणांना होतील एवढी ताकद प्रत्येकाची आहे. ही निवडणूक महत्वाची आहे, मतपत्रिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सतीश चव्हाणांना पहिल्या पसंतीचे मत द्यायचे आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.
पदवीधरमध्ये मत बाद होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. विधानसभेत होत नाही पण पदवीधरमध्ये मतं कशी बाद होतात? हे वेगळं सांगायची गरज नाही. यावेळी मतं बाद होणार नाही याची काळजी आपल्या घ्यायची आहे. शंभर टक्के मतदान कसे होईल, यासाठीच पुढील दिवसात काम करायचे आहे. तुम्ही माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, मी ही तुमच्या विश्वासाला शेवटच्या श्वासापर्यंत तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुंडे यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.