परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी वाल्मीक कराडची आठवण काढत एक भावनिक विधान केले.
त्यांनी “एक व्यक्ती आज आपल्या सोबत नाही” असा उल्लेख करून कराडच्या अनुपस्थितीबद्दल भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या वक्तव्यानंतर सभेत काही क्षण शांतता पसरली असून हे विधान परळीच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Parli Municipal Council Election : परळी नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या जुन्या सहकाऱ्याची म्हणजेच वाल्मिक कराडची आठवण झाल्याचे दिसून आले. जगमित्र कार्यालयातून गोर-गरिबांची सेवा करत आलो, गेल्या नऊ-दहा महिन्यापासून हे कार्यालय सुरू आहे, काम सुरू आहे. पण आज एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, याची जाणीवही होते. काय चुकले काय नाही ते न्यायालय बघेल, पण ती जाणीव नक्कीच आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या वाल्मिक कराडचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड गेल्या काही महिन्यापासून बीडच्या कारागृहात कैद आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाशी मुंडे यांचे नावही जोडले गेले. यातूनच त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले. तरी देखील धनंजय मुंडे यांना परळी नगर परिषदे निवडणुकीच्या निमित्ताने वाल्मिक कराड याची आठवण आली आणि ती त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.
परळी नगर परिषदेच्या प्रचारासाठी परळीत आज एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात केवळ परळीत महायुती एकत्रितपणे लढत आहे. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे याही सभेला उपस्थितीत होत्या. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात परळीची बदनामी, आपल्याला वर्षभरापासून झालेला त्रास, ज्यांना मदत केली तेच सहकारी साथ सोडून गेले याबद्दलची खदखद आपल्या भाषणातून व्यक्त केली. विरोधकांना औकात दाखवावी लागेल, असा इशारा देतानाच भाषणाच्या शेवटी वाल्मीक कराडची आठवण काढली. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, मला अभिमान वाटतो, उभ्या महाराष्ट्रात फक्त परळीत महायुती झाली. निवडणुका जशा खाली खाली येतात तेवढ्या त्या अडचणीच्या होतात. ज्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांच्याबद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. नाराज होऊ नका, महायुती तुमचा सन्मान योग्य पद्धतीने करेल. ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे, माझ्या, ताईंच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. परळीला गेल्या वर्षभरापासून बदनाम केलं त्यांना थोबाडात चोख उत्तर देण्याची ही संधी आहे.
त्यांची जागा दाखवून द्यायची आहे
भर निवडणुकीत उगाच काही करायची वेळ येऊ देऊ नका, असा सूचक इशाराही त्यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही. निवडणुक सोपी नाही, हलक्यात घेऊ नका.आम्ही कमी पडणार नाही, तुम्हीही कुठं कमी पडू नका. वर्षभरापासून मी काय सहन केलं मलाच माहित. एवढे वार होऊनही मी डगमगलो नाही. ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन दगा फटका केला त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. 'औकात मे लाना पडेगा, कई तालाब अपनी हद भुले हुये है' अशा शायरीतून त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
उठसुठ परळीत यायंच आणि आरोप करायचे. नांदऱ्यांच शेत तर स्मशान आहे, असं सांगितलं गेलं. हे काय आहे? असा उद्विग्न सवाल मुंडे यांनी केला. सेवा करत आलोय, बारा महिने चोवीस तास जगमित्र चालू होतं, आज नऊ-दहा महिने झाले काम सुरू आहे, कार्यालय सुरू आहे. हे बोलत असताना आपल्या सोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव सुध्दा होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकाऱ्याला सहकारी माणणारा म्हणून मला याची जाणीव करून द्यावी लागेल. काय चुकंल कायं नाही? ते न्यायालयं बघेल, पण सहकारी म्हणून ही जाणीव नक्कीच होते, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडची आठवण काढली.
1. धनंजय मुंडेंनी कोणाचा उल्लेख केला?
त्यांनी वाल्मीक कराडची आठवण काढत “एक व्यक्ती आज सोबत नाही” असे म्हटले.
2. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत.
3. मुंडेंच्या विधानावर काय प्रतिक्रिया मिळत आहेत?
कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
4. वाल्मीक कराड कोण होते?
ते परळी परिसरातील सक्रिय आणि प्रभावी स्थानिक नेते होते, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ते तुरुंगात आहेत.
5. या विधानाचा निवडणूक प्रचारावर कसा परिणाम होऊ शकतो?
भावनिक संदेशामुळे स्थानिक मतदारांमध्ये सहानुभूती आणि सकारात्मक प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.