Dhananjay Munde-Sunil Tatkare-Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा मंत्रीपदासाठी वशीला व्हाया 'तटकरे टू अजितदादा'!

Maharashtra Political News: एक आशेचा किरण कृषी घोटाळ्याच्या आरोपातून सुटका झाल्यानंतर निर्माण झाला. अजित पवारांनीही धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वापसीचे संकेत दिले.

Jagdish Pansare

  1. धनंजय मुंडे यांची अस्वस्थता वाढली असून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे जबाबदारीची मागणी केली आहे.

  2. या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

  3. महाराष्ट्राच्या राजकारणात या घडामोडीमुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Beed Political News : कायम सत्तेत आणि मंत्रीपदाची झुल अंगावर पांघरूण वावरण्याची सवय झालेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांची चलबिचल सध्या वाढली आहे. हक्काच्या बीड जिल्ह्यात त्यांना वर्चस्वासाठी धडपड करावी लागत आहे. विरोधकांच्या दबावापुढे पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनाही झुकावे लागले आणि आपल्या लाडक्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना आपण मात्र बाजूला फेकले गेलो आहोत, याची जाणीवर धनंजय मुंडे यांना प्रकर्षाने होऊ लागली आहे.

अजित पवारांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे घेत सगळी सुत्रं हलवायला सुरूवात केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व असलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे विरोधक अधिक प्रबळ होत आहेत. त्यांनी आपापल्या मतदारसंघासह जिल्ह्यावर पकड मिळवायला सुरूवात केली आहे. अशावेळी धनंजय मुंडे यांच्या मनाची घालमेल वाढू लागली आहे. राज्यात आरक्षणाचा विषय तापला आहे, बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली. त्या व्यासपीठावर जात मुंडे यांनी कमबॅकचा प्रयत्न केला. परंतु 'वंजारा-बंजारा एक छं' या त्याच्या विधानाने गोची केली.

राजकारणात आपल्याला सुनील तटकरे यांचा कायम आधार राहिला आहे, त्यांचे आणि माझे संबंध हे सगळ्याना माहित आहे, असे म्हणत आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. आता रिकामं ठेवू नका, जबाबादारी द्या या त्यांच्या विधानातून मला मिळाली तेवढी शिक्षा पुरे झाली, आता तुम्हीच अजितदादांना सांगा अन् मंत्रीपद द्या, असाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ काढला जात आहे. आता धनंजय मुंडेंचा हा वशीला व्हाया सुनील तटकरे (Sunil Tatkare) टू अजितदादा पोचतो का? त्यांच्यावर पक्ष जबाबदारी टाकतो का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

नेतृ्त्व आपल्याकडे येण्याऐवजी बंजारा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अजितदादा पुनरागमनाचा गांभीर्याने विचार करत नसल्याने अखेर धनंजय मुंडे यांनी आपला मोर्चा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे वळवला आहे. कर्जत मधील एक पक्षाच्या सत्कार कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात ' चुकलो तर कान धरा, नाही चुकलो तर चालतयं, पण आता रिकाम ठेवू नका, जबाबदारी द्या', असे साकडे घातले.

पंकजा इन, धनंजय आऊट..

बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या. 2019 मध्ये परळी मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे जवळपास पाच-वर्ष अक्षरशः अडगळीत पडल्या होत्या. त्यांचे राजकारण संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा बीडच्या राजकारणात एकच हुकमी एक्का होता तो म्हणजे धनंजय मुंडे. महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे, फडणवीस सरकारमध्येही मुंडे यांना महत्वाचे मंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व राखत धनंजय मुंडे यांनी सगळा पक्षच आपल्या ताब्यात ठेवला होता.

पण वर्षभरापुर्वी जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकरणाने धनंजय मुंडे यांच्या या राजकीय वर्चस्वाला ग्रहण लागले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि खून प्रकरणाचे शिंतोडे मुंडे यांच्याही अंगावर पडले. त्यांचा विश्वासू सहकारी वाल्मिक कराड हाच या प्रकरणातला मुख्य म्होरक्या निघाल्याने सहाजिकच त्याला पाठीशी घातल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर झाला. हे कमी काय म्हणून कृषीमंत्री पदाच्या काळातील यंत्र-औषधी खरेदी प्रकरणातील घोटाळ्याचा आरोप, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने दिलेला दणका, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील गैरव्यवहाराच्या आरोपाने धनंजय मुंडे पुरते अडकले.

विरोधकांनी त्यांच्याविरोधात रान पेटवले, जितका धनंजय मुंडे यांच्या बचावाचा अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला, तेवढी त्यांच्या राजीनाम्याची मागणी नेटाने पुढे येऊ लागली. सरकारच्या विश्वासहार्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा जड अंतकरणाने घेण्यात आला. एक आशेचा किरण कृषी घोटाळ्याच्या आरोपातून सुटका झाल्यानंतर निर्माण झाला. अजित पवारांनीही धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वापसीचे संकेत दिले. पण फडणवीसांनी तोपर्यंत छगन भुजबळ यांच्यासाठी मार्ग खुला करून देत ओबीसींना गोंजारण्याचा मार्ग प्रशस्त केला होता.

परिणामी धनंजय मुंडे यांच्या आशेवर पाणी फिरले. एकीकडे राज्यात आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांचे राजकीय वजन वाढू लागले, तर धनंजय मुंडे यांचे घटले. अशावेळी धनंजय मुंडे यांची घुसमट होणे सहाजिक आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे, कृषी घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. ही संधी हुकली तर चार वर्ष वाट पहावी लागणार आहे. अशावेळी सुनील तटकरे यांच्यामार्फत अजित पवारांकडे वशीला लावण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो यावरच धनंजय मुंडे यांचे कमबॅक अवलंबून असणार आहे.

FAQs

प्र.1: धनंजय मुंडे यांनी कोणाकडे जबाबदारीची मागणी केली?
उ.1: त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली.

प्र.2: मुंडे यांच्या या मागणीमुळे काय परिणाम झाला?
उ.2: पक्षात मोठी खळबळ आणि चर्चा सुरू झाली.

प्र.3: सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया काय आहे?
उ.3: अधिकृत प्रतिक्रिया अजून समोर आलेली नाही.

प्र.4: या हालचालीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
उ.4: नव्या समीकरणांची शक्यता निर्माण होऊ शकते.

प्र.5: पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कसा प्रतिसाद मिळत आहे?
उ.5: काहींनी समर्थन दर्शवले तर काहींनी यावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT