Dhananjay Munde-Prakash Solanke-Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Beed: धनंजय मुंडे मंत्रिमंडळात 'कमबॅक' करण्याच्या तयारीत... 'मराठा विरुद्ध ओबीसी' कार्ड खेळत प्रकाश सोळंकेंनी काढली हवा

Dhananjay Munde, Prakash Solanke, Beed Politics: धनंजय मुंडे यांच्या संभाव्य राजकीय पुनरागमनाच्या चर्चांदरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत बीड जिल्ह्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आणला.

Jagdish Pansare

Beed News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापासून प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्या भाषणाची राज्यभरात चर्चा झाली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेली जवळीक धनंजय मुंडे यांना भोवली आणि त्यांना मंत्रीपद गमवावे लागले. तेव्हापासून ते मंत्रीमंडळात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. अजित पवार हयात असताना त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही.

बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि धनंजय मुंडे यांच्या वापसीचे दरवाजेही बंद झाले. मात्र मुंडे यांनी आशा सोडली नव्हती. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलून दाखवली. क्रिकेट विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादव याच्याशी स्वतःची तुलना करत जस त्याला संघाबाहेर काढण्यात आलं तशीच माझी अवस्था असल्याची खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

यावर हजरजबाबी प्रफुल्ल पटेल यांनी तुमचा रोख आमच्या लक्षात आला, पण तुम्हाला पुन्हा नक्की संधी मिळेल, असे सांगत तुम्ही बाद झाला नव्हतात, तर रिटायर्ड हर्ड झाला होता, अशी टोलेबाजी केली. त्यानंतर पुन्हा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील परतीचा मार्ग खुला झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. धनंजय मुंडेंना बॅटिंगची संधी मिळणार, असे वाटत असतानाच बीड जिल्ह्यातील त्यांचे पक्षांतर्ग राजकीय विरोधक माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी टायमिंग साधत मुंडेंवर टीका करत नो बाॅल टाकला आहे.

विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केले, कोट्यावधी रुपये देऊन माझ्या विरोधात उमेदवार उभे केले, पण तुमच्या प्रेमामुळे मी निवडून आलो, असा हल्लाबोल केला. या टीकेनेतर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा सोळंके विरुद्ध मुंडे असा राजकीय संघर्ष भडकला आहे. सोळंके आणि मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्ष हा बीड जिल्ह्यात गेली तीस वर्षापासून सुरू आहे.

२०२४ मध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळंके यांच्याविरोधात धनगर समाजाचे नेते माधव निर्मळ आणि मराठा समाजाचे रमेश आडसकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या दोघांना पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांना पराभूत करण्यासाठी उभे केले होते, असा आरोप केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहन जगताप यांच्याशी प्रकाश सोळंके यांची लढत झाली होती. दोन तगडे अपक्ष उमेदवार असताना सोळंके यांनी सहा हजार मतांनी विजय मिळवला होता. तेव्हापासून सोळंके यांचा मुंडे बहिण-भावांना असलेला विरोध अधिक वाढला.

त्यानंतर सोळंके यांच्याकडून पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार सुरू झाले. ऑगस्ट २०२५ मध्ये सोळंके यांनी मोठा राजकीय डाव टाकत भाजपचे ओबीसी नेते आणि गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय राजाभाऊ मुंडे व त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा भाजपमधून फोडून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला होता. राजाभाऊ मुंडे यांचे नाव बीड जिल्हा बँक घोटाळ्यात आले होते आणि ते गोपीनाथ मुंडेंचे जवळचे होते. त्यांच्या मुलाला आपल्या गटात घेऊन सोळंके यांनी मुंडे घराण्यालाच धक्का दिल्याची चर्चा तेव्हा होती.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाला उघड पाठिंबा दिल्यामुळे, परळीच्या या बहीण-भावंडांनी कोट्यावधी रुपये खर्च करून मराठा व ओबीसी उमेदवार उभे करत आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप सोळंके यांनी माजलगाव येथील धनगर समाजाच्या एका कार्यक्रमात केला. सोळंकेंचा पराभव करण्यासाठी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या. माजलगाव मतदारसंघात धनगर आणि मराठा समाजातील लोकांना पुढे करून कोट्यावधी रुपये वाटले, असेही ते म्हणाले. या टीकेमागे लोकसभेतील पंकजा मुंडेंचा पराभव आणि सोळंकेंनी मराठा आंदोलनाला दिलेला पाठिंबा हे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रकाश सोळंके यांच्या धनंजय-पंकजा मुंडे यांच्यावरील टीकेनंतर सोळंके विरुद्ध मुंडे असे सोशल मिडिया वाॅर सुरू झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील परतीच्या चर्चेला सुरूवात होताच प्रकाश सोळंके यांनी पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वादाला हवा दिल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे यांची विकेट पडल्यानंतर पुन्हा त्यांना खेळण्याची संधी मिळू नये, असाच सोळंके यांचा प्रयत्न दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT