

Dhananjay Munde News: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे एक विश्वासू आणि जवळचे नेते म्हणून धनंजय मुंडेंची ओळख राहिली आहे. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांचेही निकटवर्तीय मानले जातात. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेले मुंडेंच्या यशाला उतरती कळा लागली. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोपांचे शिंतोडे उडाल्यानंतर त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं.गेले वर्षे दीडवर्षे धनंजय मुंडे हे प्रचंड बॅकफूटला गेले आहेत.
धनंजय मुंडे हे आता झालं ते पुरे म्हणत यापूर्वी अजितदादा आणि आता सुनेत्रा पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही त्यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकसाठी जोरदार फिल्डिंग लावताना दिसून येत आहे. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोरच पुन्हा मंत्रिपदाचा मुद्दा छेडला. यावेळी पटेलांनाही त्यांच्या मंत्रिपदाच्या इच्छेवर आशेची फुंकर मारली. पण खरंच त्यांचं मंत्रिमंडळातील कमबॅक पटेलांच्या आश्वासनानंतरही निश्चितच सोपं नसणार आहे.
धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिपद किंवा नवीन संधीसाठी पूर्णताकदीनिशी कामाला लागले आहेत. त्यात त्यांना एकीकडे पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणीत मोठी जबाबदारी देणार असल्याचं संकेत दिले आहेत. याचदरम्यान, मुंडेंसाठी प्रफुल पटेल यांनीच स्वत:मंत्रिपदाचे दरवाजे उघडले असल्याचं बोललं जात आहे.
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात तुम्ही आता 12 वे राहणार नाही, तुम्हालाही संधी मिळेल. आम्ही कायम 12 वे राहणार त्याची आम्हाला जाणीव आहे. पण,एक निश्चित आहे की, राजकारणात-खेळ असो किंवा खेळात राजकारण असो. सूर्यकुमार यादवला ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, त्यांना संघाबाहेर करण्यात आलं. वयाच्या 15 व्या वर्षी सुद्धा वैभव सूर्यवंशीला संधी मिळते, याचा अर्थ कर्तृत्व, निष्ठा, कामाला सर्वश्रेष्ठ स्थान देणे गरजेचं असल्याचं सांगत अजितदादांचं स्वप्न पूर्ण करू शकतो असा विश्वासही पक्षनेतृत्वाला दिला.
यावर प्रफुल पटेल यांनी धनंजय मुंडे बोलले,शेवटचा कार्यकर्ता कुणी नॉटआऊट राहिला नाही पाहिजे. धनंजय तुझा इशारा आम्हाला समजला आहे.तुम्ही चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट होतो ना, किक्रेटच्या परिभाषेत. रिटायर्ड हर्ट होतो, क्रिकेटमध्ये त्यांना परत बॅटिंग करायची संधी दिली जाते. विकेट पडलेल्यांमध्ये त्यांचा समावेश होत नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका, असं म्हणत धनंजय मुंडेंना लवकरच संधी मिळणार असल्याचं संकेतही पटेल यांनी दिले आहेत.
पण धनंजय मुंडेंना पॉईंट मंत्रिपदापर्यंत पोहोचण्यात अनेक मुद्दे अडथळे ठरण्याची शक्यता आहे. त्यातला पहिला आणि तितकाच गंभीर मुद्दा म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. या प्रकऱणात मुंडे यांचा राईट हॅंड असलेल्या वाल्मिक कराडसह सर्व आरोपी अजून तुरुंगात आहे.हे प्रकरण न्यायप्रलंबित असताना मुंडेंची मंत्रिमंडळातील कमबॅक धोक्याचं ठरु शकतं.
दुसरा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर उफाळून आलेला मराठवाड्यातला मराठा विरुद्ध ओबीसी वंजारी संघर्ष मुंडेंचं नाव जर मंत्रिपदासाठी चर्चेत आलं,तर पुन्हा उफाळू शकतो. एकीकडे मनोज जरांगेंच्य पुन्हा एकदा आंदोलन कुठंतरी मिटवण्यात दमछाक झाल्यानंतर मुंडेंच्या मंत्रिपदाची रिस्क घेत मराठा समाजाची मोठी नाराजी फडणवीस किंवा महायुती सरकार ओढवून घेणं शक्य आहे.
तिसरा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडेंच्या कृषिमंत्री पदाच्या काळातील यंत्र-औषधी खरेदी प्रकरणातील घोटाळ्याचा आरोप बाहेर काढला जाण्याची शक्यता आहे. त्यात मुंडे विरोधी गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया किंवा त्यांचे विरोधक असलेले भाजप आमदार सुरेश धस,मनोज जरांगे पाटील, प्रकाश सोळुंके यांसारखे नेतेमंडळी पुन्हा अॅक्टिव्ह होऊ शकतात.
चौथा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सध्यातरी कोणता बदल होण्याची शक्यता नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदी वर्णी लागलेल्या छगन भुजबळ हे लगेच खातं सोडण्याची सूतराम शक्यता नाही. आधीच ते राज्यसभा उमेदवारी व पुतण्याच्या मंत्रिमंडळातील समावेशावरुन नाराज असताना त्यांच्या जागी मुंडेंची वर्णा लागणं जवळपास अशक्यप्राय मानलं जात आहे.
पाचवा मुद्दा म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीत वर्षानुवर्षे वेटिंगवर असलेल्या इच्छुकांना डावलत घरातच उमेदवारी दिली गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठं नाराजीनाट्य उफाळून आलं आहे. यात पुन्हा एकदा मुंडेंचं नाव मंत्रिपदासाठी पुढं आलं तर पक्षासमोर वादाचा आणखी एक मुद्दा उपस्थित होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.