Reservation News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातून उभारलेला लढा आता अधिक आक्रमक होऊ लागला आहे. वारंवार आश्वासने आणि शब्द देऊनही सरकार तो पाळत नसल्याने समाज संतप्त होऊन रस्त्यावर उतरू लागला आहे. धनगर आरक्षण आंदोलनकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली. त्यांच्या उपोषणाला नऊ दिवस उलटून गेले आहेत.
दीपक बोऱ्हाडे यांनी राज्यभरातील धनगर बांधवांना मुंबईत येण्याचे आवाहन केल्यानंतर राज्याची राजधानी पुन्हा आंदोलनाने गजबजू लागली आहे. राज्य सरकार जोपर्यंत आरक्षणाच जीआर काढणार नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा दीपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे. उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत असल्याने आंदोलक आक्रमक होऊ लागले आहेत. मुंबईत रास्तारोकोचा प्रयत्न वारंवार केला जातोय.
तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार सर्वसामान्य नागरिकांना, मुंबईतील वाहतूकीला आंदोलनाचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन कसरत करतांना दिसत आहे. धनगर आरक्षणाला मराठा समाजाने आपला पाठिंबा दर्शवला आहे. काल मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते व मनोज पाटील जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दीपक बोऱ्हाडे यांची मुंबईत भेट घेऊन पाठिंबा दर्शवला होता.
त्यानंतर आता मनोज पाटील जरांगे हे स्वतः मुंबईकडे रवाना झाले आहेत. दुपारी दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषण स्थळाला भेट देऊन जरांगे पाटील हे धनगर आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनात उतरले तर ते अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
दरम्यान, राज्यभरातून धनगर समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. हजारोंच्या संख्येने धनगर बांधव मुंबईच्या रस्त्यावर दिसत आहेत. तर दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती देखील दिवसेंदिवस ढासळत आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप आज वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाज बांधव मुंबईत दाखल होत असून सरकारवर दबाव वाढत आहे. धनगर समाजाचा समावेश ST (Scheduled Tribe) प्रवर्गात करून घटनादत्त आरक्षण लागू करावे. या प्रमुख मागणीसाठी मुंबईत हे आंदोलन सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.