Maharashtra MLC News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात उस्मनाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक झाली आहे. पण बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नसतानाही ही निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हा नियम वापरून या ठिकाणी निवडणूक घोषित केली आहे. धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमधील एकूण मतदार हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत.
2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपने वर्चस्व नसतानाही विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात फोडाफोडी करीत भाजपचे सुरेश धस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 72 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत जगदाळे यांना 452 मते पडली होती तर भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 525 मते मिळाली होती.
आता नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात या तिन्ही जिल्ह्यात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. धाराशिव-बीड-लातूर जिल्ह्यातील संख्याबळ पाहता याठिकाणी भाजपचे एकहाती वर्चस्व दिसून येत आहे. लातूर, धाराशिव जिल्हा परिषद आणि तीन जिल्ह्यातील 18 नगरपालिका व सहा नगर पंचायतीपैकी बहुतांश ठिकाणी भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक काहीशी सोपी आहे.
या मतदारसंघातील 3 जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात भाजप आणि शिवसेनेत इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणत इनकमिंग झाले आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून काही बडे चेहरे या दोन्ही पक्षात दाखल झाले आहेत. विधान परिषदेच्या या एका जागेवर इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढणार आहे.
2018 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम आहे. यंदा या जागेवर भाजपकडून माजी आमदार बसवराज पाटील, धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अर्चना पाटील-चाकूरकर यांची नावे चर्चेत आहे.
जागा काँग्रेसच लढणार?
धाराशिव-बीड-लातूर या मतदारसंघाचा इतिहास पाहता या ठिकाणी 1994 मध्ये काँग्रेसकडून नरेंद्र बोरगावकर विजयी झाले होते. त्यानंतर 2000, 2006 व 2012 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेस नेते दिलीप देशमुख यांनी हॅट्ट्रिक केली होती. तर त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडत अदलाबदल करण्यात आली होती. यावेळेस संख्याबळानुसार धाराशिव-बीड-लातूर ही जागा काँग्रेसच लढण्याची दाट शक्यता आहे.
अशोक जगदाळे पुन्हा मैदानात?
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे भाजप उमेदवार सुरेश धस बिनविरोध निवडून येण्याची शक्यता होती. पण अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी उमेदवारी कायम ठेवली होती.
जगदाळे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला होता. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मोठ्या संख्येने असताना त्याठिकाणी 100 ते 125 मतदार भाजपने फोडून चमत्कार घडवला होता. आता त्यावेळी चुरशीने लढत देणाऱ्या अशोक जगदाळे यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे काँग्रेसचे प्लॅनिंग असल्याचे समजते.
बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य वगळता धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्यात एकूण 881 मतदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 301, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 68, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 138 असे एकूण 537 सदस्य महायुतीचे आहेत तर काँग्रेस 155, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 32, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 54 असे एकूण 241 सदस्य महविकास आघाडीचे आहेत. त्याशिवाय अपक्ष 25, छोटे पक्ष व विविध आघाडीचे 78 मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सध्यस्थितीत या ठिकाणी महायुतीमधील भाजपचे प्राबल्य दिसून येत आहे.