Dharashiv Tipu Sultan Jayanti; BJP Corporator Vilas Londhe Sarkarnama
मराठवाडा

BJP Corporator : भाजप नगरसेवकानेच साजरी केली टिपू सुलतान यांची जयंती? व्हिडिओ व्हायरल होताच दिले स्पष्टीकरण; म्हणाला...

BJP Corporator Vilas Londhe Attends Tipu Sultan Jayanti in Dharashiv : राज्यात एकीकडे टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्याने राजकीय वर्तुळात वाद सुरू झाला आहे. तेथे भाजपच्या एका नगरसेवकाने टिपू सुलतान यांची जयंती साजरी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Dharashiv News : म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंती उत्सवावरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू असतानाच आता धाराशिवमध्येही या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे. शहरातील टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक विलास लोंढे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमात एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी लोंढे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, भाजप नगरसेवकाच्या उपस्थितीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागील कारण नगरसेवक विलास लोंढे यांनी स्पष्ट केले आहे.

लातूरमधील टिपू सुलतान जयंतीवरून आधीच वाद

नोव्हेंबर २०२६ मध्ये लातूर येथे टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित होते. यावेळी अमित देशमुख यांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच टिपू सुलतान यांच्याविषयीची पुस्तके आणि माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उल्लेख करत त्यांना 'शेर-ए-हिंद' आणि 'शहीद हजरत टिपू सुलतान' असे संबोधले होते.

या कार्यक्रमानंतर भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर टीका करण्यात आली होती. टिपू सुलतान यांच्या जयंती उत्सवावरून राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. हा वाद चर्चेत असतानाच आता धाराशिवमधील कार्यक्रमामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

धाराशिवमध्ये भाजप नगरसेवकाची जयंती कार्यक्रमाला हजेरी

धाराशिव शहरातील टिपू सुलतान चौकात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक विलास लोंढे यांनी उपस्थिती लावली. यावेळी एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी लोंढे यांचे जंगी स्वागत केले. दोन्ही नगरसेवक एकाच कार्यक्रमात उपस्थित असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भाजप नगरसेवकाने टिपू सुलतान यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने स्थानिक राजकारणात या घटनेचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. सोशल मीडियावरही या उपस्थितीवरून चर्चा सुरू झाली आहे.

निमंत्रणामुळे कार्यक्रमाला उपस्थिती, नगरसेवकांचे स्पष्टीकरण

या कार्यक्रमाबाबत एमआयएमचे नगरसेवक अझहर मुजावर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विलास लोंढे यांचा आणि माझा प्रभाग एकमेकांना जोडलेला आहे. आम्ही दोघेही या परिसराचे लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे जयंती कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण स्वीकारून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

दुसरीकडे भाजप नगरसेवक विलास लोंढे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली. प्रभागातील कार्यक्रम असल्याने आयोजकांकडून निमंत्रण मिळाले होते. त्यामुळे निमंत्रण स्वीकारून आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे त्यांनी सांगितले.

धाराशिवमधील या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून सुरू असलेली राजकीय चर्चा पुन्हा रंगली आहे. भाजप नगरसेवकाच्या उपस्थितीमुळे स्थानिक राजकारणात या घटनेची चर्चा होत असून, सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT