Dharashiv Bjp News
Dharashiv Bjp News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Bjp News : नवा जिल्हाध्यक्ष राणा पाटलांच्या मर्जीतला, की ठाकूर गटाचा ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : भाजपची राज्य कार्यकारीणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यानी केल्यानंतर त्यात जिल्ह्यातील १३ लोकांचा निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सुजितसिंह ठाकुर यांना पुन्हा संघटनेच्या कामासाठी निमंत्रित केले आहे. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचा समावेश यादीमध्ये झाल्याने आता नव्याने कोण जिल्हाध्यक्ष होणार याची चर्चा सूरु झाली आहे.

आमदार राणा पाटील (Ranajagjeetsingh Patil) यांच्या गटातील सतिष दंडनाईक व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांना संधी देण्यात आली आहे. जुन्या व नव्या लोकांचा यादीत समावेश करताना जुन्या कार्यकर्तांना अधिक महत्व देण्यात आल्याचे दिसुन येत आहे. (Bjp) भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या निमित्ताने आता जिल्ह्यात चांगलीच चर्चा सूरु झाली आहे. राज्य कार्यकारीणी झाल्यानंतर आता जिल्हा पातळीवरही त्याची प्रक्रिया सूरु होणार आहे.

नितीन काळे यांचा समावेश राज्य सदस्यामध्ये झाल्याने त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार हे पाहवे लागणार आहे. (Osmanabad District) यामध्ये राज्य कार्यकारीणीवर असणाऱ्यांपैकी दत्ता कुलकर्णी यांचा यादीमध्ये समावेश नसल्याने हे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धेत असणार असे संकेत मिळत आहेत. राणा पाटील यांच्या गटाकडुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. जुन्या व नव्या मंडळीमध्ये नेमकी संधी कोणाला मिळणार हे काही दिवसात कळणार आहे.

दत्ता कुलकर्णी यानी जिल्हाध्यक्ष पदासाठी जाहीर इच्छा बोलुन दाखविलेली नसली तरी जुन्या मंडळीना विश्वासात घेण्याची व नव्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्याने संघटना त्यांच्यावर जबाबदारी टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वेळीही जुन्या भाजपच्या नितीन काळे यांना संधी दिली असली तरी त्यांच्यात व जुन्या भाजपमध्येच अनेक गोष्टीवर मतभेद झाल्याचे दिसुन आले होते. ते टाळण्यासाठी यावेळी काय मार्ग काढला जाणार हे पाहवे लागणार आहे.

आजारपणामुळे काहीसे दुर राहिलेले सुजीतसिंह ठाकुर यांचा सार्वजनिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग दिसत असल्याने त्याची भुमिका महत्वाची ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी जातीय समीकरणाचा विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा चेहरा देण्याचा विचार केल्यास भाजपकडे जुन्या संघटनेचे व सध्या संघटन सरचिटणीस असलेले अॅड. नितीन भोसले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अॅड. अभयराजे चालुक्य यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

ओबीसी चेहरा म्हणुन नेताजी पाटील यांचे निर्विवादपणे नाव पुढे येऊ शकते तर लिंगायत समाजाला अध्यक्षपद द्यायचे झाल्यास अॅड. दिपक आलुरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावेळी संघटना राणा पाटील गटाला की सुजीतसिंह ठाकुर गटाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे. गेल्यावेळी ठाकुर यांनी काळेंच्या पारड्यात वजन टाकले पण नंतर काळेंनी ठाकुरांची साथ सोडुन राणा पाटील यांच्याशी जवळीक साधल्याचे बोलले जाते. त्यामुळे गेल्या तीन साडेतीन वर्षात जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या संदर्भात जाहीरपणे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. धाराशिव नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी पक्षाच्या चिन्हावर निवडुन आलेल्या योगेश जाधव यांना डावलुन त्यावेळी राणा पाटील गटाचे अभय इंगळे याना संधी देण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कैलास शिंदे वगळता एकाही जुन्या कार्यकर्त्यांस उमेदवारी दिली नाही, पुढे जुने- नवे वादातुन कैलास शिंदे यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिग्वीजय शिंदे यानी पक्षाला जय श्रीराम करीत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला.

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत तर एकाही जुन्या कार्यकर्त्यास संधी मिळाली नाही. त्यामुळे काळे अध्यक्ष असले तरी कारभार मात्र राणा पाटीलच हाकतात, अशी टिका काळे यांच्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT