Crop Insurance Sarkarnama
मराठवाडा

Crop Insurance : पीकविमा कंपनीस झटका; शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार मोठी रक्कम जमा

Dharashiv Collector : खरीप 2022 चा पीक विमा 28 जानेवारीपर्यंत मिळणार

Sunil Balasaheb Dhumal

शितल वाघमारे

Dharashiv Political News : मागील वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी अडकलेले 294 कोटी रूपये मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी वसुलीच्या कारवाईचा बडगा उगारताच पीकविमा कंपनीने 232 कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा 2022 च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी रखडलेली पीकविम्याची रक्कम 28 जानेवारीपर्यंत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप 2022 या हंगामात झालेल्या नुकसान भरपाईपोटी 294 कोटी आठ लाख रूपये विमा मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत वर्षभरापूर्वी तसे आदेश देण्यात आले होते. जिल्हा स्तरावरून विभागस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीतही ही रक्कम विमा कंपनीच्या खात्यातून जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वळती करण्याबाबत निर्णय झाला.

ऑगस्ट 2023 साली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीतही विमा कंपनीने तत्काळ 294 कोटी रूपयांचा पीकविमा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र या तिन्ही टप्प्यावरील निर्णयाला भारतीय कृषी महाकंपनीने चक्क केराची टोपली दाखवली होती. विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने तीनवेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यालाही विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 29 डिसेंबर रोजी खाते गोठवण्याचे आदेश देण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विमा कंपनीचे खाते गोठवण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर पीकविमा कंपनी ताळ्यावर आली. भारतीय कृषी विमा कंपनीचे उपव्यवस्थापक दिलीप डांगे, क्षेत्रीय व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत यांनी सोमवार, 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेतली. प्रस्तावित कारवाई परत घेण्याबाबत लेखी विनंती केली. वसुलीपोटी दावा करण्यात आलेल्या 294 कोटींपैकी 12 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. विमा हप्त्यापोटी 50 कोटी रूपये अद्याप कंपनीस प्राप्त झालेले नाहीत.

आता 28 जानेवारीपर्यंत 232 कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवली आहे. 25 जानेवारीपूर्वी 232 कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी कंपनीला सूचना केल्या आहेत. उर्वरित 50 कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याचे काही मंडळांतील शेतकर्‍यांच्या खात्यावर विमा रक्कम उशीरा जमा होईल, याची नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT