Mahayuti Leader Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti News : मतदारसंघ एकच दावा तीन पक्षांचा; महायुतीत धाराशिव-कळंब कोणाला मिळणार?

Sachin Waghmare

Dharashiv News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांतील घडामोडीना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार याची उत्सुकता सर्वच पक्षाना लागली असताना धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत महायुतीत वाद असणाऱ्या जागांवर चर्चा होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत तोडगा न निघणाऱ्या जागांबाबत दिल्लीत अमित शाह यांच्यासमवेत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असतानाच आता धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघावर महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात धाराशिव लोकसभेप्रमाणे महायुतीमधील भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच पहावयास मिळत आहे. ( Mahayuti News)

या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत पुन्हा ते महाविकास आघाडीतून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याची असल्याने शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे.

दुसरीकडे या जागेवर भाजपने तयारी सुरु केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातून भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील हे आमदार आहेत. तर उमरगा व परंडा मतदारसंघात शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले, पालकमंत्री तानाजी सावंत हे आमदार आहेत. त्यामुळे भाजपने तुळजापूर व धाराशिव मतदारसंघ भाजपला सोडावेत, अशी मागणी लावून धरली आहे. त्यासोबतच भाजपने धाराशिव मतदारसंघातील बूथ कमिट्याची नेमणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही जागा सुटण्यापूर्वीच भाजपने तयारी सुरु केली असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिवाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली होती. यावेळी राष्ट्रवादीने भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यांचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ३ लाख ३० हजार मताने पराभव केला होता. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात तीन पक्षांनी ही जागा मागितली असल्याने महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, सुधीर पाटील, अनिल खोचरे, शिवाजी कापसे हे इच्छुक आहेत. तर भाजपकडून दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांची नावे चर्चेत आहेत तर अजित पवार गटाकडून विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांचे नाव चर्चेत आहेत. त्यामुळे आता ही जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला सुटणार याची उत्सुकता लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT