Dharashiv Loksabha News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Loksabha News : 'मित्रपक्षांना दावा करण्याचा अधिकार, मात्र 'धाराशिव'बाबत निर्णय नाही' ; राणाजगजितसिंह म्हणाले...

RanajagjitSinh News: राणादादा म्हणतात, हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला हे डिसेंबर अखेरीस स्पष्ट होईल...

अय्यूब कादरी

Dharashiv Loksabha News : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत लोकसभेच्या विविध जागांवरून वाद सुरू झाला आहे. धाराशिव मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला नसतानाही कार्यकर्ते आणि पदाधिकारी जागांवर दावा ठोकू लागले आहेत. धाराशिव मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाने दावा ठोकला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटानेही ही जागा आपलीच असल्याचे जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

यासंदर्भात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले की, या मतदारसंघात भाजपची भूमिका मोठ्या भावाची आहे. याचा अर्थ असा नाही की महायुतीतील मित्रपक्षांनी मतदारसंघावर आपला दावा सांगू नये. त्यांनी आपला दावा जरूर सांगावा, तो त्यांचा अधिकार आहे. हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्याबाबत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

डिसेंबरअखेरपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे अपेक्षित आहे. जागावाटप होण्यापूर्वी काही प्रक्रिया केल्या जातात. सर्वेक्षण होते. उमेदवार कोण असेल याची चाचपणी केली जाते, त्यासाठी लोकांची मते जाणून घेतली जातात. त्यानंतर जागा कोणत्या पक्षाला सुटणार, याचा निर्णय होतो. धाराशिव मतदारसंघ महायुतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला येईल, हे अद्याप ठरलेले नाही.

महायुतीत भाजप हा मोठा भाऊ आहे. धाराशिव मतदारसंघाचा विचार केला तर सध्या हा भाजप मोठ्या भावाप्रमाणे समंजसपणे वागताना दिसत आहे. पदाधिकारीच काय कार्यकर्तेही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहेत. वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय मान्य केला जाईल, असे ते सांगत आहेत. हा मतदारसंघ आमचाच आहे, असा आततायीपणा भाजपकडून अद्याप तरी करण्यात आलेला नाही. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांत (तुळजापूर, बार्शी-अपक्ष, भाजपशी संलग्न, औसा) भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी शिंदे गटाचे (उमरगा, भूम-परंडा) आणि एका ठिकाणी (धाराशिव) ठाकरे गटाचा आमदार आहे. 'मिशन 45' पूर्ण करण्यासाठी भाजपने समंजसपणाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांनी 2019 मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. मोदी लाटेतही त्यांनी 4,65,000 मते मिळाली होती. शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे 1,27,000 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झाली.

आता अजितदादा पवार हे भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. शिवसेनेतही दोन गट आहेत. त्यादृष्टीने विचार केल्यास मतदारसंघात भाजप सर्वात शक्तीशाली पक्ष आहे, असे या पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना वाटणे साहजिक आहे. असे असले तरी आमदार पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही समंजसपणाची भूमिका घेतली आहे. मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबत वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल, तो मान्य करण्यात येईल, अशी भूमिका नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटणार आहे, असा दावा अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे उमेदवार असीतल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या शिंदे गटाने पत्रकार परिषद घेऊन मतदारसंघावर दावा ठोकला होता. विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे आता ठाकरे गटात असले तरी त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटणार, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते अनंत जाधव यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT