Lok Sabha Election2024 Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : 'गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांमध्ये आणखी एकाची भर'; धाराशिव भाजपात डझनभर इच्छुक...

Dharashi Political News : महायुतीची उमेदवारी जाहीर करताना धाराशिवची डोकेदुखी उफाळणार...

Shital Waghmare

Dharashiv News : मी 2019 पासून धाराशिव लोकसभेसाठी कार्य करत आहे, परंतु त्यावेळी मला संधी मिळाली नाही. मी लोकसभा मतदारसंघात काम केले असून, लोकांच्या थेट संपर्कात आहे. लोकसभा उमेदवारीसाठी मी वरिष्ठांकडे मागणी केली असल्याचे सांगत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांनीही या जागेवर दावा केला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीतील सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटातून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश बिराजदार हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत, तर भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्यातील डझनभर इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे, ते म्हणजे भाजप कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांचे. आपण पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितल्याचे जाहीर करत त्यांनी दावा ठोकला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीतील भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी धाराशिवची जागा कोणता पक्ष लढवणार? अद्याप हे स्पष्ट झालेले नाही. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात आज 15 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. 1989 पासून मी राजकारणात सक्रिय आहे. त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास कोणीही तयार नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मी पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. तेव्हापासून मी राजकारण आणि समाजकारण करत आहे.

यापूर्वी मी शिवसेनेत काम करत होतो, आता भाजपमध्ये काम करतो. मी भारतीय जनता पक्षाचे पूर्ण वेळ काम करीत असून, 2019 मध्ये भाजप- शिवसेनेची युती झाली, त्यामुळे मी लोकसभेच्या तयारीचे काम थांबवले व युतीच्या उमेदवाराच्या निवडीसाठी काम केले. खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात माझाही वाटा होता. महायुतीमध्ये धाराशिव जिल्हा लोकसभेसाठी मी खरा दावेदार आहे.

मी केंद्रीय कार्यकारिणी व राज्यातील नेत्यांकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत मी केलेल्या विविध कामांचा अहवाल मी त्यांच्याकडे सुपूर्त केला आहे. माझ्या कामाची दखल पक्षश्रेष्ठी नक्की घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात मागील 25 वर्षांपासून विरोधात आणि सत्तेतही घराणेशाही आहे. जिल्ह्यात विकासकामांचा श्रेयवाद हा मोठ्या प्रमाणात आहे.

काहीही काम न करता मी केलं, मी केलं म्हणणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यामध्ये विकासकामांसाठी कुणीही एकत्र येत नसल्याची खंतही पाटील यांनी बोलून दाखवली. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या कामाविषयी विचारले असता ते म्हणाले की, जनता समाधानी असली पाहिजे. कार्यकर्तासुद्धा कामासाठी समाधानी असला पाहिजे, तरच त्या खासदाराच्या कामाचे मूल्यमापन होईल. महायुतीने कुठलाही उमेदवार दिल्यास त्याला पूर्णपणे ताकदीने निवडून देऊ, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT