Dharashiv Politics: ऑपरेशन टायगरमुळे धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर आता महायुतीचा भाग बनले आहेत. जिल्ह्यातील त्यांचे पारंपारिक राजकीय शत्रू आणि ज्या पद्मसिंह पाटील यांच्यावर पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे, त्या पाटील यांचे आमदार पूत्र राणा जगजीतसिंह पाटील यांनी ओमराजे यांचे महायुतीत स्वागत आहे, असा खोचक टोला लगावला होता.
ते आता महायुतीत आहेत, त्यामुळे आमचा त्यांच्याशी वाद नाही, असे म्हणत राणा पाटील यांनी ओमराजे यांना डिवचले होते. तर ओमराजे यांनी राणाजगीजीतसिंह पाटील यांच्या नीच प्रवृत्तीच्या विरोधात असलेले माझे मन या जन्मात बदलणार नाही, असे म्हटले होते.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यांना पक्षात आणून त्यांच्या लोकसभा उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाल्याचे जाहीर केले. मात्र भाजपाच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र वेगळाच सूर आहे. ओम राजेनिंबाळकर यांना कायम आव्हान देणारे राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील हेच धाराशीव जिल्ह्याचे भावी खासदार असतील अशी बॅनरबाजी आतापासूनच त्यांच्या समर्थकांकडून सुरू झाली आहे.
ओमराजे यांच्यासाठी त्यांनी केलेले पक्षांतर हे भविष्यात सोपे असणार नाही, याचेच हे बॅनर संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ओम राजेनिंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्वाधिक मताधिक्याने लोकसभेत निवडून गेले. दोन टर्म खासदार राहिलेले ओमराजे यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर त्यांना ज्या लोकांनी डोक्यावर घेतले तेच आता त्यांना धडा शिकवण्याची भाषा करत आहेत.
एकीकडे ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांकडून धडा शिकवण्याची भाषा, तर दुसरीकडे महायुतीतील मित्र पक्षाकडूनच २०२९ मध्ये ओम राजेनिंबाळकर यांचा पत्ता कट करण्याची तयारी सुरू झाल्याचे या बॅनरबाजीवरून दिसू लागले आहे. पवन राजेनिंबाळकर खून प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब आक्रमक झाले आहे. वीस वर्ष आमच्या कुटुंबाने खूप भोगले, आम्हाला बदनाम केले गेले, मनस्ताप झाला, पण सत्याचा विजय झाला म्हणत राणा पाटील यांनी निकालावर भाष्य केले.
एकीकडे पवनराजे खून प्रकरणाचा निकाल तर दुसरीकडे ज्या ओम राजेनिंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील व इतरांवर आपल्या वडीलांच्या खूनाचा आरोप केला होता तेच आता सत्ताधारी महायुती पक्षाचे भाग बनल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. या बदलत्या राजकीय समीकरणाची झलक मल्हार पाटील यांचा धाराशीव जिल्ह्याचे भावी खासदार म्हणून सुरू झालेल्या ब्रॅन्डींगमधून दिसू लागली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी मल्हार पाटील यांना धाराशिवचे भावी खासदार म्हणून दर्शवणारे बॅनर लावले आहे. धाराशिव जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजपा आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा या जागेवर दावा सांगण्याची अधिक शक्यता आहे. याची सुरूवात मल्हार पाटील यांच्या बॅनरबाजीतून सुरू झाली आहे. यातून शिवसेनेला हा मतदारसंघ राखताना भाजपाशी मोठा संघर्ष करावा लागू शकतो असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.