

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार दिवसांपासून 'ऑपरेशन टायगर' ची प्रचंड चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह ६ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, हे जवळपास निश्चित आहे. पण या चार दिवसांच्या नाटकात अद्याप कोणताही अधिकृत फोटो, स्वाक्षरीचे पत्र किंवा जाहीर प्रवेश झालेला नाही.
दुसऱ्या बाजूला, हे खासदार उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या ते ना ठाकरेंसोबत आहेत, ना अधिकृतपणे शिंदेंसोबत. अशात वडिलांच्या हत्याकांडाचा निकालही ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात गेला आहे. या 'त्रिशंकू' अवस्थेमुळे ओम राजेनिंबाळकर यांचे राजकीय टायमिंग चुकल्याची चर्चा सुरु आहे.
या सगळ्यामुळे ओम राजेनिंबाळकर यांचे संपूर्ण राजकीय अस्तित्वच धोक्यात आले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रचंड बदनामी; ना धड इकडे, ना धड तिकडे!
बंडाची चर्चा सुरू होऊन 4 दिवस झाले, तरी ओम राजेनिंबाळकर यांनी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. "मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ," असे मोघम उत्तर त्यांनी दिले आहे. पण याच 4 दिवसांत सोशल मीडिया आणि धाराशिवच्या गल्लीबोळात त्यांची प्रचंड बदनामी सुरू झाली आहे. ज्या मतदारसंघाने त्यांना डोक्यावर घेतले, तिथेच आता त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्यांच्या राजकीय प्रतिमेला कधीही भरून न निघणारी तडे गेले आहेत.
निकालाचा धक्का आणि कमालीची हताश अवस्था :
ओम राजेनिंबाळकर सध्या वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या प्रचंड हताश आहेत. त्यांच्या राजकारणाचा पाया ज्या पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणावर उभा होता, त्याचा अंतिम निकाल नुकताच लागला आणि कोर्टाने त्यांचे पारंपारिक राजकीय विरोधक, माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. वडिलांना न्याय मिळवून देण्यात आलेल्या अपयशामुळे ओम राजेनिंबाळकर आधीच खचलेले असताना, आता राजकीय आघाडीवरही त्यांनी घेतलेला हा आत्मघातकी पाऊल त्यांना आणखी गर्तेत ढकलणारे ठरत आहे.
शत्रूशीच सख्य करण्याची नामुष्की?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले, तर ओम राजेनिंबाळकर यांना महायुतीचा भाग व्हावे लागेल. महायुतीमध्ये त्यांचे कट्टर आणि पारंपारिक विरोधक पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील हे आधीच ठाण मांडून बसले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पाटील विरूद्ध निंबाळकर हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.
ज्या विरोधावर ओम राजेनिंबाळकर यांचे नेतृत्व उभे राहिले, ज्यांच्याविरुद्ध लढून ते आमदार आणि खासदार झाले, उद्या महायुतीच्या मंचावर त्याच राणाजगजितसिंह पाटलांच्या शेजारी बसावे लागेल, त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ही तडजोड कशी पचणार? ज्या दिवशी ओम राजेनिंबाळकर महायुतीचा झेंडा हाती घेतील, त्याच दिवशी त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपून ते राणाजगजितसिंह यांचे 'ज्युनिअर पार्टनर' बनतील, ही भीती नाकारता येत नाही.
तिकीट आणि चिन्हाचा मोठा पेच!
समजा ओम राजेनिंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तरी पुढच्या लोकसभेला त्यांना तिकीट मिळेलच याची काय हमी? धाराशिव लोकसभा मतदारसंघ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वाट्याला आला होता. भाजपने तो राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला आणि उमेदवारही दिला.
आता भाजप किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या सेनेसाठी सोडण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. जागा सोडलीच नाही, तर ओम राजेनिंबाळकर यांना स्वतःचे चिन्ह सोडून 'कमळ' किंवा 'घड्याळ' चिन्हावर लढावे लागेल, जे त्यांच्या कट्टर शिवसैनिक कार्यकर्त्यांना कधीच मान्य होणार नाही. अशा स्थितीत त्यांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता जवळपास शून्य होईल.
'मातोश्री'चे दरवाजे आता कायमचे बंद?
ओम राजेनिंबाळकरांनी जर पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा विचार केला, तर तिथेही आता पूर्वीसारखा सन्मान मिळणे अशक्य आहे. 'मातोश्री'चे कोंडाळे आता त्यांच्याकडे कायम संशयाच्याच नजरेने पाहणार. त्यांची विश्वासार्हता संपल्यामुळे पुढच्या वेळी ठाकरे त्यांना तिकीट देतील की नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
शिदोरीच संपली :
वडील पवन राजेनिंबाळकरांच्या हत्येची सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली निष्ठा, या दोन शिदोरीवर ओम राजेनिंबाळकर यांचे राजकारण चालत होते. कोर्टाच्या निकालाने पहिली शिदोरी हिरावून घेतली आणि आता या अपरिपक्व राजकीय टायमिंगमुळे दुसरी शिदोरीही संपण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे शत्रूच्या छावणीत जाऊन शरण यायचे की स्वगृही परतून संशयाचे दाट धुके अंगावर घ्यायचे? या चक्रव्यूहात ओम राजेनिंबाळकर यांचे असे अडकले आहेत, जिथून बाहेर पडताना त्यांचे राजकारण इतिहास जमा होण्याचीच शक्यता अधिक दिसते आहे!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.