Marathwada Politics : धाराशीव जिल्हा परिषदेच्या तेर आणि केशेगाव गटातून भाजपच्या अर्चना पाटील रिंगणात उतरल्या आहेत. तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून द्यायचा आहे, असे आवाहन करताना त्यांनी अर्ज दाखल करतानाच अध्यक्षपदावरच दावा सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण अर्ज दाखल करताच त्यांनी तो माघारी घेण्याचीही तयारी केल्याची माहिती आहे.
तेर गटातून पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सक्षणा सलगर यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताच सलगर यांनी अर्चना पाटील यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. "पक्ष आपल्या खिशात असल्यासारखे वागत, त्यांनी 2 जागा अडवल्या आहेत. मग बाकीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का?" असा सवाल त्यांनी केला.
लोकसभा निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूकमध्येही अर्चना पाटील यांनाच संधी दिल्याने सलगर यांनी घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य अशी लढाई असल्याचे म्हंटले. अर्चना पाटील फक्त अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढवत आहेत. त्या खरोखरच जनतेसाठी लढत असतील, तर त्यांनी जाहीर करावे की त्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत. एखाद्या सामान्य महिलेला अध्यक्ष करण्याची तयारी दाखवावी, असे आव्हानही दिले. अध्यक्षपद सामान्य महिला कार्यकर्त्याला मिळावे, अशी माझी भावना आहे, असेही त्यांनी सांगितले.
या जिव्हारी लागणाऱ्या टीकेनंतर अर्चना पाटील यांनी एका गटातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी सुरु केली आहे. आता त्या नेमक्या ते गटातून माघार घेणार की केशेगाव गटातून माघार घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे गाव तेर या गटात येते. मात्र, सक्षणा सलगर यांनी येथे दिलेले आव्हान आणि अध्यक्षपदावरून उपस्थित केलेले सवाल यामुळे येथील निवडणूक केवळ एका गटापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
अर्चना पाटील होणार अध्यक्ष?
यावेळचे जिल्हा परिषद अध्यक्षपद 'सर्वसाधारण महिला'प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. अर्चना पाटील या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असल्याने भाजपने सत्ता मिळवल्यास त्या जिल्हा परिषदेच्या पुढील अध्यक्ष असतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अर्चना पाटील यांनी यापूर्वीही धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.