Dharashiva News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiva : पारधी समाजात उजाडतेय 'नवी पहाट'; 'गुन्हेगारी जमात' शिक्का पुसणार...

Shital Waghmare

Dharashiva : इंग्रजांच्या राजवटीत पारधी समाजावर 'गुन्हेगारी जमात' असा शिक्का बसला, तो स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं उलटली तरीही कायम आहे. आपल्या देशात आजही अनेक जाती उपेक्षित असून खडतर जिणं जगत आहेत. भटकंती करीत जगणारा पारधी समाज हा त्यापैकीच एक. या जमातीला आपल्या माथी गुन्हेगारीचा शिक्का घेऊन फिरावं लागत आहे.

पारधी व इतर आदिवासी समाजातील युवकांना गुन्हेगारीपासून परावृत्त व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या समाजाच्या आयुष्यात आलेला अंधार 'पहाट' कार्यक्रमाद्वारे नाहीसा करून प्रकाश देण्याचं काम जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी करीत आहेत.

धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेने पहाट उपक्रमांतर्गत पारधी व इतर समाजातील बेरोजगार तरुणांसाठी धाराशिव जिल्हा पोलिस दलाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन 22 व 23 जानेवारी रोजी करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातून 400 ते 500 बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोदवला आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्याची कार्यवाही सहभागी कंपन्यांमार्फत सुरू करण्यात आली आहे.

अतुल कुलकर्णी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, मुंबई, जीवन बीमा निगम, धाराशिव, एस. बी. आय. कार्डस व नोहो करिअर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपन्या सामील झाल्या आहेत. कार्यक्रमास पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, सहायक आयुक्त कौशल्य विकास, धाराशिवचे संजय गुरव, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबईचे प्रशिक्षक इस्माईल तंटे, जीवन बीमा निगम धाराशिवचे डेव्हलपमेंट ऑफिसर सिद्धांत मेटकर, एस. बी. आय. कार्डचे प्रतीक ढावारे, सूरज सुरवसे, तसेच नोहो करिअर प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे मानव संसाधन विभागप्रमुख दत्तात्रय पुरी हे उपस्थित होते.

मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील अदिवासी, पारधी, विमुक्त-भटक्या जाती-जमाती या समाजाच्या लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे, रेशनकार्ड देणे, मतदारयादीत त्यांचे नाव नोंदविणे, आधार नोंदणीकरण करणे, संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ देणे आदींसह विविध योजनांचा लाभ शिबिरे घेऊन देण्यात आला आहे. पहाट उपक्रमाने प्रेरित होऊन अनेक पारधी समाजातील बांधवांनी गुन्हेगारी कायमची सोडून कुठेतरी मोलमजुरी आणि कष्ट करून जगण्याचा मार्ग निवडला आहे.

कार्यक्रमास सहायक आयुक्त संजय गुरव यांनी सरकारच्या कौशल्य विकास विभागातर्फे बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशिक्षक ईस्माईल तंटे यांनी बेरोजगार युवक-युवतींसाठी असलेल्या कौशल्यपूर्ण रोजगाराबाबत माहिती देऊन त्यातून होणाऱ्या रोजगारनिर्मितीबाबत मार्गदर्शन केले व त्यांच्या संस्थेतर्फे आयोजिण्यात येत असलेल्या प्रकरणाची माहिती दिली.

पहाट कार्यक्रमांतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारधी व इतर समाजातील युवक-युवतींसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुलांना पोलिस भरती आणि भरतीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. येणाऱ्या नवीन पिढीला चांगले शिक्षण, प्रशिक्षण आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT