Chhatrapati Sambhajinagar News : राज्यभरातील मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रिया काही अपवाद वगळता व्यवस्थित पार पडल्यानंतर आता शहर-जिल्हाध्यक्ष पदावरून राजकारण सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष पदाचा वाद थेट मुंबईत पोहचला आहे. खासदार भागवत कराड यांनी विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नावाला सुरवातीला विरोध केल्याने हा विषय स्थानिक पदाधिकार्यांनी मुंबईत राज्य पातळीवरील नेत्यांच्या कानावर घातला.
शहराध्यक्ष पदावर जाहीरपणे मत व्यक्त केल्यानंतर खासदार कराड (Bhagwat Karad) यांची कोंडी स्थानिक पदाधिकार्यांनी केली. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी भूमिका बदलली. बोराळकर यांना आपला विरोध नाही, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीला यश मिळाले, अशी सारवासारव कराड यांनी केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) शहराध्यक्ष निवडीचा गुंता वाढत चालला आहे. स्थानिक नेत्यांमध्ये पदासाठी चर्चेत असलेल्या कुणा एकाच्या नावावर एकमत होईना, असे चित्र आहे. दरम्यान, यावरून मुंबईत स्थानिक नेत्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. यामुळे नवीन शहराध्यक्षाची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी पक्षाने स्थानिक पदाधिकारी, नेत्यांकडून काही नावे जाणून घेतली.
त्यानुसार पक्षातील विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी अशा 21 कॅटेगिरीतील 23 पदाधिकार्यांनी आपली मते बंद पाकिटात निरीक्षकांकडे पाठवली आहेत. यानंतर मुंबईत संपूर्ण राज्यभरातील शहराध्यक्ष निवडीबाबत वरिष्ठांमध्ये खलबते सुरू आहेत. पुढील दोन दिवसांत नावे अंतिम करून शहराध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, शहरातील स्थानिक नेते, पदाधिकारी मुंबईत गेले होते. यावेळी त्यांच्यामध्ये शहराध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या चार जणांच्या नावांपैकी कुणाच्याही नावावर एकमत होत नसल्याचे समोर आले. यामुळे शहराच्या अध्यक्षपदाचा गुंता वाढतच चालल्याचे दिसून आले. यावेळी शहराध्यक्षपदासाठी चर्चेतील तीन नावांवर उपस्थित स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. यावर त्यापैकी कुणा एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे? यावर एकमत होईना.
यातील एकाच्या नावावरून स्थानिक नेत्यांत चांगलाच वाद झाला. यानंतर दोन नावे निश्चित करण्यात आली. ही दोन नावे वरिष्ठांकडे सोपविण्यात आली. परंतु, एकदंरित दोन बड्या स्थानिक नेत्यांतील वाद पाहता हे प्रकरण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली. शहराध्यक्षपदासाठी चर्चेत विद्यमान अध्यक्ष शिरीष बोराळकर, समीर राजूरकर, जालिंदर शेंडगे, दिलीप थोरात यांची नावे सध्या चर्चेत आहेत. यापैकी कुठली दोन नावे वरिष्ठांकडे देण्यात आली हे मात्र कळू शकले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.