Minister Eknath Shinde-Abdul Sattar-Khaire
Minister Eknath Shinde-Abdul Sattar-Khaire Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : जिल्हा बॅंक सत्तारांची नाही, तर शेतकऱ्यांची ; कर्ज वेळेवर फेडा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : जिल्हा बॅंकेचा एनपीए हा दहा टक्के एवढा आहे, त्यामुळे इथले संचालक मंडळ चांगले काम करत आहे, अशी कौतुकाची थाप राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यासह बॅंकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या पाठीवर दिली. पण ती देत असतांनाच ही बॅंके सत्तारांची, नितीन पाटलांची नाही, तर शेतकऱ्यांची असल्याचेही ठणकावून सांगितले. (Aurangabad) त्यामुळे घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करा, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितीत अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पाच हजार अंगवाडी सेविका व मदतनीस महिलांना प्रत्येक १ लाखांचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. या कर्जाचे वाटप आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर कर्जवितरण सोहळा पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करतांना एकनाथ शिंदे यांनी स्व. आनंद दिघे यांची एक आठवण देखील आवर्जून सांगितली. कर्ज आईच्या मायेने द्यावे, आणि वसुल बापाच्या धाकाने करावे, असे दिघे साहेब नेहमी सांगायचे असे शिंदे म्हणाले. जिल्हा बॅंकेने राज्यात पहिल्यांदा अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना १ लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल बॅंकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

शिंदे म्हणाले, १० टक्के एनपीए असलेली तुमची बॅंक राज्यात एक यशस्वी बॅंक म्हणून ओळखली जाते. एनपीएजर पाच टक्यांवर आणता आला तर ते बॅंकेच्या भवितव्यासाठी आणखी बरे होईल. ज्या महिलांना कुणीही वैयक्तिक कर्ज देत नव्हते, त्या अंगणवाडी सेविका, मदतनीस पाच हजार महिलांना कर्ज देण्याचा निर्णय खरंच कौतुकास पात्र आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपला जीव धोक्यात घालून पडेल ते काम केले. त्यामुळे या महिलांना कर्ज देतांना व्याजदरात काही सुट देता आली तर अधिक चांगले होईल, अशी सूचना देखील शिंदे यांनी केली. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, इलेक्ट्रीक मोटार व इतर बाबींसाठी कर्ज दिले जाते. व्यवयासिक आणि नोकरदारांना देखील वैयक्तिक कर्ज दिले जाते.

खऱ्या अर्थाने ही बॅंक शेतकऱ्यांची आहे, त्यांच्या विकासासाठी आहे. त्यामुळे मिळालेल्या कर्जाची परतफेड वेळेत करणे हे देखील प्रत्येक कर्जदाराचे कर्तव्य आहे. ही जिल्हा बॅंके अब्दुल सत्तार किंवा अध्यक्ष नितीन पाटील यांची नाही, तर ती शेतकऱ्यांची तुमची आहे, हे लक्षात ठेवून कर्जाची परतफेड करा, असे आवाहन देखील शिंदे यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारने कोरोना, चक्रीवादळ अशा संकटात देखील विकासकामांना कात्री लागू दिली नाही,असे सांगतानाच बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासात गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा देखील केला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी व्याजदरात सूट देण्याची इच्छा व्यक्त करताच सत्तार यांनी ताबडतोब १ टक्का व्याजात सवलत देत असल्याचे जाहीर केले. या शिवाय सर्व आशा वर्करांना देखील जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज देण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT