Abdul Sattar News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : वेगवान सरकारमधील मंत्र्याचा मुलगाच दुष्काळासाठी काढणार मोर्चा...

Jagdish Pansare

Marathwada Shivsena News : राज्यातील सत्ता ज्यांच्या हाती आहे, निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्याच मंत्र्यांचा मुलगा जर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करणार असेल तर याला काय म्हणावे. (Drought News) राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराचे कौतुक करताना थकत नाहीत. शेतकऱ्यांसाठी शिंदे किती काम करतात, याचा उल्लेख सत्तार वारंवार आपल्या भाषणातून करत असतात.

एकीकडे राज्याच्या वेगवान कारभार, सगळ्या वर्गांचा विकास होत असल्याचा दावा आणि दुसरीकडे याच सरकारमधील मंत्र्यांचा मुलगा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून मोर्चा कढणार. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सोयगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आला आहे.

परंतु सिल्लोड तालुक्यातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आलेली असतानाही हा तालुका वगळण्यात आल्याचा दावा करत सत्तार यांचे चिरंजीव उपनगराध्यक्ष समीर सत्तार यांनी सिल्लोड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. (Marathwada) येत्या ११ नोव्हेंबर रोजी म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधीच हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. (Farmers) मंत्र्यांचा मुलगाच आपल्या सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याने याची चर्चा होत आहे.

अब्दुल सत्तार हे शिंदेंच्या मंत्रिमंडळात आधी कृषिमंत्री आणि आता पणन व अल्पसंख्याक विकास खात्याचा कारभार पाहत आहेत. सर्वाधिक निधी, योजना आणि प्रकल्प मंजूर करून घेत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सत्तार यांनी बाजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर प्रचंड खूष असलेल्या सत्तार यांच्या मुलाने मात्र वेगळीच भूमिका घेत सरकारविरोधात मोर्चा काढण्याची तयारी चालवली आहे. मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर व्हावा, अशी अब्दुल सत्तार यांचीही मागणी होती. परंतु सोयगावचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत झाल्यामुळे त्यांना आपल्या सरकारविरोधात मंत्री असल्यामुळे भूमिका घेणे अडचणीचे ठरले असते.

कदाचित त्यामुळे सत्तारांनी आपल्या मुलाला पुढे करून तर सरकारवर दबाव आणण्याची खेळी केली नाही ना? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. आधीच सत्ताधारी मंत्री, आमदारांच्या मतदारसंघातील तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधकांकडून होत आहे. अशावेळी सत्तारांनी सिल्लोड तालुक्याचा आग्रह धरणे चुकीचे ठरले असते. त्यामुळे त्यांनीच मुलगा समीर याला पुढे करत सिल्लोड तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा सल्ला दिला की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT