cjp abhijeet dipke Sarkarnama
मराठवाडा

Dummy Students in Municipal School : पाहणीची चाहूल लागताच ‘डमी विद्यार्थी’? महापालिका शाळेवर गंभीर आरोप

Dummy students allegation sparks demand for municipal probe : लेबर कॉलनीतील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळेत बाहेरील विद्यार्थ्यांना बसवल्याचा अभिजित दिपके यांचा दावा; चौकशी करून कारवाईची मागणी

Pradeep Pendhare

Latur Municipal School : महापालिकेच्या लेबर कॉलनीतील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळेच्या पाहणीदरम्यान बाहेरील विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात आल्याचा आरोप क्रॉक्रोच जनता पार्टी उपहासात्मक आंदोलनाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे.

या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सीजेपीने ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत दिपके यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शाळेला भेट देत तेथील शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी केली. यावेळी काही विद्यार्थी (Student) जमिनीवर बसून शिक्षण घेत असल्याचे त्यांनी पाहिले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पिण्याचे पाणी, बेंच, गणवेश, पंखे आणि इतर सुविधांबाबत प्रश्न विचारले.

दरम्यान, उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनीच ही आपली शाळा नसल्याचे सांगितल्याचा दावा दिपके (Abhijeet Dipke) यांनी केला. त्यानंतर संबंधित विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आणून येथे बसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारानंतर दिपके यांनी महापालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शाळेतील परिस्थितीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले, “आम्ही पाहणीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाहेरील विद्यार्थ्यांना येथे आणण्यात आले. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात असल्याचा आरोप गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.” शाळेतील वर्गखोल्या, शिक्षकांची संख्या आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. चौथीपर्यंतच्या या शाळेत दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक असल्याचा दावा करत त्यांनी शाळेची स्थिती सुधारण्याची मागणी केली.

प्रशासनाकडून चौकशीचे आश्वासन

डमी विद्यार्थी बसवल्याच्या आरोपाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच शाळेतील आवश्यक सुविधांबाबतही लक्ष दिले जाईल, असे आश्वासन उपायुक्त वसुधा फड यांनी दिल्याचे दीपके यांनी सांगितले.

आमदार फोडण्यापेक्षा शाळा सुधारा

सरकारच्या प्राधान्यक्रमावर टीका करत दिपके यांनी शाळांमधील मूलभूत सुविधांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. “राजकीय घडामोडींवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. त्याऐवजी सरकारी आणि महापालिका शाळांमधील सुविधा सुधारण्यासाठी निधी वापरला तर गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी मिळेल,” असे ते म्हणाले.

प्रशासन काय कारवाई करणार?

लातूर जिल्ह्यातील अनेक शाळांची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचा दावा करत त्यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याची मागणी केली. पीएम केअर्स निधीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, शाळेत बाहेरील विद्यार्थ्यांना बसवण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून होणारी कारवाई याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT