Jalna-Chhatrapati Sambhjinagar MLC Election : जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची शिवसेनेची जागा भाजपने आपल्याकडे घेतली आहे. यानंतर दोन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेनेचे आधी दोन तुकडे केले, आता आमचे मुंडकेच उडवण्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत आमदार अब्दुल सत्तार यांनी खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या सत्तेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्यागाचा मोठा वाटा आहे. आमचा त्याग कामाख्या देवीला माहित आहे, पण भाजप तो विसरलीय, अशा शब्दात सत्तार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची शिवसेनेची जागा भाजपने आपल्याकडे घेतली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर आहे. अब्दुल सत्तार यांचे सुपूत्र समीर सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुलाने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला न विचारता अर्ज भरल्याचे सांगत सत्तार यांनी या कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
भाजपकडून शिवसेनेला व्यक्तीशः आपल्याला मतदारसंघात, जिल्ह्यात त्रास दिला जात असल्याचा आरोप सत्तार यांनी केला. मुलाने अर्ज भरल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या निवडणुकीसाठीची रणनिती ठरणार आहे. मी शिंदे साहेबांच्या विश्वासावर जिल्ह्यात राजकारण करतो, ते जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल. याबाबत मी मुख्यमंत्री यांनाही आश्वासित केले आहे.
शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रकारचे राजकारण जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आम्हाला दूर ठेवण्यात आले. जिल्हा बँकेत शिवसेनेची सत्ता होती, तिथेही आमच्याच काही लोकांना हाताशी धरून भाजप ही बँकही आमच्याकडून हिसकवू पाहत आहे, अशा प्रकारे मित्र पक्षाशी वागणे योग्य नाही. याचा परिणाम आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर होत आहे, अशावेळी आम्हाला कुठे तरी विचार करावा लागेल? असा सूचक इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
आमचं धडच वेगळ केलं...
शिवसेनेकडे असलेली जालना-संभाजीनगर मतदारसंघाची जागा भाजपने घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपने शिवसेनेचे तुकडे केले. आता ते हातपाय तोडत आहेत, असा संताप व्यक्त केला होता. याकडे सत्तार यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, ही वस्तुस्थिती आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे भाजपने हात-पाय तोडले, पण आमचं धडच छाटलं, असा आरोप सत्तार यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये कधी काळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होती. आज काय परिस्थिती आहे? तशी परिस्थिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊ देऊ नये, एवढीच विनंती आहे. आम्ही महाराष्ट्रात आमची 'ममता' होऊ देणार नाही, असेही सत्तार म्हणाले. अंबादास दानवे यांनी हीच दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे, याकडे सत्तार यांचे लक्ष वेधले असता त्यांनीही याला दुजोरा दिला. परंतु याचा निर्णय माझ्या हातात नाही, एकनाथ शिंदे हेच यावर बोलू शकतात. माझ्या हाती हा निर्णय असता तर मी लगेच घेतला असता असे म्हणत उद्धव ठाकरे यांची आठवण काढली.
यावेळी अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेसाठी मुलाने अपक्ष अर्ज दाखल केला ही बाब सहज घेण्यासारखी निश्चितच नाही. अब्दुल सत्तार यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहिली तर त्यांच्या बंडखोरीचा इतिहास सगळ्यांना माहित आहे. विधान परिषदेच्या निमित्ताने सत्तार यांनी पुन्हा बंडाचे हत्यार उपसले तर नवल वाटू नये. सत्तार यांच्या या जाहीर आरोप आणि त्यांच्या मुलाने दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जाचे भवितव्य चार जून रोजी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.