Abdul Sattar Pressure Politics : अब्दुल सत्तार पुन्हा बंडाच्या पावित्र्यात? दबावतंत्रातून एकनाथ शिंदेंना झटका...

Abdul Sattar Sanjay Shirsat Eknath Shinde : आमदार अब्दुल सत्तार हे स्वतःच्या मनासारखे झाले नाही तर बंडाचे निशाण फडकवून पक्ष नेतृत्वावर दबाव आणतात. ही त्याची जुनी कार्यपद्धती असल्याचे सांगितले जाते.
Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Sanjay Shirsat-Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : आमदार अब्दुल सत्तार पुन्हा बंडाच्या पावित्र्यात आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्याला कारण म्हणजे सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात झालेल्या पक्ष मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना सूचक इशारा दिला.

निधी वाटपावरून सावत्रापेक्षा वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप करत सत्तार यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांची तक्रारच पक्षाच्या नेत्यांकडे केली. निधी मिळाला नाही तर पक्ष कसा चालवयचा? भविष्यात याचा फटका बसेल, ही भीती होती की धमकी? यावरही चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आपलं गाऱ्हाणं मांडण्याचे माध्यम म्हणून अब्दुल सत्तार यांना मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचा पुरेपूर वापर केला. शक्ती प्रदर्शनातून माझ्या मतदारसंघात लुडबूड नको, निधी भरघोस हवा, मीच सगळे निर्णय घेणार, असेच एकंदरित सत्तार यांना सुचवायचे होते. सत्तार यांचे पंचवीस तीस वर्षांचे राजकारण पाहता ते कोणाच्या दबावात काम करत नाही हे दिसून आले आहे.

स्वतःच्या मनासारखे झाले नाही तर बंडाचे निशाण फडकवून ते पक्ष नेतृत्वावर दबाव आणतात. ही त्याची जुनी कार्यपद्धती आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मात्र डच्चू देण्यात आला. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघातून सलग तीस वर्षापासून सत्तार निवडून येत आहेत, त्याच सिल्लोड-सोयगावमध्ये यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराने घाम फोडला.

लाखाहून अधिक मतांनी निवडून येण्याचा दावा करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा पराभव अवघ्या 2420 मतांनी टळला. सत्तार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसले तरी त्याबद्दल उघड नाराजी व्यक्त न करता गेली दीड-दोन वर्ष सत्तार यांनी पुन्हा आपला संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. नगरपरिषदेची सत्ता राखली पण पंचायत समिती आणि सोयगाव तालुक्यातील सत्तारांच्या वर्चस्वाला धक्का बसला. त्यानंतर मात्र सत्तारांनी पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला आहे.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांचे उदय सामंत यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन; पण मतदारसंघात शिवसेनेची पिछेहाट झाल्याचीही कबुली!

उद्योग मंत्री उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्तारांनी हातचे न राखता आपल्या मनातील सगळी खदखद त्यांच्यासमोर बोलून दाखवली. जिल्हा परिषद निवडणुकीत चांगले यश मिळवूनही सत्तेत जाता आले नाही, महापालिकेत आपण बॅकफूटवर गेलो याची जाणीव करून देत त्यांनी संजय शिरसाट यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्याच कार्यकाळात आपल्या मतदारसंघावर निधीच्या बाबतीत कसा अन्याय होत आहे? त्याचे परिणाम काय होतील? याबाबतही सूचक इशारा दिला.

विधान परिषदेसाठी दबावतंत्र?

सत्तार यांच्या तक्रारीचा सूर आता निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्या कानी पोचतील याची खात्री सत्तार यांना पटली असावी. सत्तार यांनी नेमकी ही आक्रमक भूमिका का घेतली? या मागे राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची निवडणूक हे ही एक कारण असल्याचे बोलले जाते. सत्तार यांना जालना-संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचा दांडगा अनुभव आहे. ते एकदा या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. या शिवाय ते कोणत्याही पक्षात असले तरी विजयी उमेदवाराला त्यांची मदत झाल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

मुलाला आमदार करणार?

जिल्हा परिषदेत मुलाला अध्यक्ष करण्याचे प्रयत्न फसल्यानंतर आता संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून थेट मुलाला आमदार करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न आहे. पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, पक्षाला भविष्यात फटका बसेल असा इशारा आणि निधी न मिळाल्याचा राग या सगळ्या गोष्टी सत्तार यांनी एकाचवेळी समोर आणल्या. पक्षावर दबाव वाढवून आपल्याला हवे ते पदरात पाडून घेण्याच सत्तार यांचा दबाव पाहता ते मुलासाठी जालना-संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगू शकतात.

उमेदवारीसाठी चूरस

युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यापूर्वी किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे यांनी या शिवसेनेच्या उमेदवारांनी इथे विजयाची पताका फडकावली होती. जालना-संभाजीनगर या दोनही जिल्ह्यांमध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद आणि महापालिका, जिल्हा परिषदे, नगरपालिका, नगरपंचायतीतील संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे भाजपाने ही जागा आम्हाला सोडा, अशी मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे शिवसेना ही जागा आमची आहे, असे म्हणत दावा सोडायला तयार नाही. अशातच सत्तार यांची बदललेली भाषा वेगळेच संकेत देत आहे.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Shiv Sena first branch : चार तरुण मुंबईला गेले अन् मराठवाड्यात हिंदुत्वाचा भगवा फडकला; गुलमंडीतील शिवसेनेच्या ‘त्या’ पहिल्या शाखेची थरारक कहाणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com