tanaji sawant .jpg sarkarnama
मराठवाडा

VIDEO : संतापजनक! प्रश्न मांडणाऱ्या शेतकऱ्याची तानाजी सावंत यांनी काढली लायकी; भर बैठकीत राडा

Akshay Sabale

Tanaji Sawant Latest News : 'खेकड्यानं धरण फोडणे' असो किंवा 'हाफकिन संस्थेला माणूस' म्हणणे असो मंत्री तानाजी सावंत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. 'राष्ट्रवादीसोबत बसल्यानं उलटी होते,' असं विधान अलीकडेच मंत्री सावंत यांनी केल्यानं महायुतीत ठिगणी पडली आहे. यातच मंत्री सावंत यांनी शेतकऱ्याची लायकी काढल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

धाराशिवमध्ये हा प्रकार घडला आहे. मात्र, बंधाऱ्याचा प्रश्न मांडणाऱ्या शेतकऱ्याची लायकी मंत्री सावंत यांनी काढल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर लगाम लावणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

घडलं काय?

शुक्रवारी ( 30 ऑगस्ट ) मंत्री सावंत ( Tanaji Sawant ) गाव संवाद दौऱ्याच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यातील वाशी, पारा, पिंपळगाव ( को ) आदी गावांत भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पिंपळगाव (को) येथे गणपती मंदिर परिसरातील एका सभागृहात मंत्री सावंत विकास कामांची माहिती सांगत होते. यावेळी उपस्थित असलेले शेतकरी श्रीधर कुरुंद यांनी बंधाऱ्याच्या दरवाज्या संबंधित प्रश्न उपस्थित केला.

'बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली असून आपण ती पाहावी,' अशी मागणी कुरुंद यांनी केली. त्यावर 10 सप्टेंबरपर्यंत दरवाजे बसतील, असं मंत्री सावंत यांनी सांगितलं. मात्र, 'बंधाऱ्याला दरवाजे बसवले, तरी बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पुढील काळात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास बसवलेल्या दरवाज्याच्या बाजूनं पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे बंधाऱ्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे,' असं शेतकरी कुरुंद यांनी म्हटलं. पण, यानंतर शेतकऱ्याचे समाधान करण्याऐवजी मंत्री सावंत चांगलेच भडकल्याचे दिसले.

मंत्री सावंत शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले, "तुम्ही खाली बसा, मी स्वत: इंजिनिअर आहे. तुमचं समाधान होण्याशी कारण आहे. तुम्ही आता सांगताय. गेल्या 10 वर्षात तुम्ही बोलले, नाहीत, आज बोलताय. आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय. विकासाचं ऐका. कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही."

"गेले 15 वर्ष आपण ब्र शब्द काढला नाही. रस्तावर पाठिभर मुरुम कोणी टाकला पाहिलं नाही. 35 वर्ष फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं. 16 हजार कोटी खर्च केले असून 95 टक्के पाणी शेतात येत आहे. सुपारी घेऊन बोलायचं नाही. आम्हालाही कळतं. त्यामुळे लायकीत राहून बोलायचं. ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही. मी गेल्या पाच वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही. मी विठ्ठलाचा भक्त आहे," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.

यानंतर पोलिस शेतकरी कुरूंद यांना बाजूला उचलून घेऊन गेले. मंत्री सावंत यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. आमदार बच्चू कडू आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री सावंत यांच्या विधानावरून टीका केली आहे.

शेतकऱ्याची लायकी काढणे उचित नाही

"सत्तेतील मंत्री अशी वक्तव्य करत असतील, तर याचा सगळा परिणाम निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय काम केले, यापेक्षा तुम्ही कशापद्धतीनं लोकांसमोर आले, हे महत्त्वाचं असते. शेतकऱ्याची लायकी काढणे उचित नाही. मंत्री सावंत यांनी माफी मागावी. शेतकरी सरकारला लायकी दाखविल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

सावंत यांनी शेतकऱ्याची माफी मागावी

"आरोग्यमंत्र्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनं शेतकऱ्याची लायकी काढली आहे. म्हणजे मंत्री सावंत यांनी स्वत:ची लायकी शेतकऱ्याला दाखवून दिली आहे. राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री सावंत यांची हकालपट्टी केली नाही. अशाप्रकारचे शेतकऱ्याची लायकी काढणाऱ्या मंत्री सावंत यांची लायकी मुख्यमंत्री शिंदे दाखविणार आहेत की नाही? मंत्री सावंत यांनी शेतकऱ्याची माफी मागावी," अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT