Dharashiv Politics : लोकसभा निवडणुकीत दिसली होती तानाजी सावंतांच्या भूमिकेची चुणूक

Guardian Minister Tanaji Sawant Viral Video : पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सावंत हे महायुतीचे काम करताहेत की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करताहेत, अशी शंका निर्माण झाली होती.
Tanaji Sawant  News Dharashiv
Tanaji Sawant News DharashivSarkarnama
Published on
Updated on

Tanaji Sawant News : धाराशिव जिल्हा हा एकेकाळी राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा बालेकिल्ला होता. राज्याच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. एक काळ तर असा होता की, पक्षात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर डॉ. पाटील यांचा शब्द चालायचा. डॉ. पाटील राजकारणातून बाजूला झाले आणि त्यांच्या विरोधकांनी उचल खाल्ली.

डॉ. पाटील यांचे पुत्र राणा जगजतिसिंह पाटील राजकारणात आले. विरोधकांसह काही निकटवर्तीयांकडूनही त्यांच्या अडचणी वाढवल्या गेल्या. महायुतीतील अंतर्गत वाद थांबायचे नाव घेत नाही. तर राज्याचे आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यामुळे नवनवीन वाद निर्माण होत आहेत.

अशातच आता सावंत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणताहेत, की आपल्याला ते पटलेच नव्हते, त्यामुळे मत द्या म्हणून मी तुमच्याकडे आलो नव्हतो. याचा संदर्भ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीशी जुळत आहे. धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणत्या पक्षाला सुटणार याचा तिढा अनेक दिवस सुटला नव्हता. तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला होता.

शिवसेना-भाजप युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. शिवसेनेचे (Shivsena) ओमराजे निंबाळकर हे 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला होता. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना 2019 मध्ये उमेदवारी देण्यात आली नव्हती. प्रा. गायकवाड हेही 2024 च्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून इच्छुक होते.

मतदारसंघ शिंदे गटाला सुटला तर डॉ. सावंत हे आपले पुतणे धनंजय सावंत यांच्यासाठी आग्रही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांना अजित पवार यांनी तयारी करायला सांगितली होती. त्यानुसार त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचे, यातून राणा जगजितसिंह पाटील आणि डॉ. सावंत यांच्या शीतुयद्ध सुरू झाले होते.

Tanaji Sawant  News Dharashiv
VIDEO : तानाजी सावंतांमुळे अर्चनाताई पाटलांचा पराभव?

धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आपल्या पसंतीची जागा मंजूर करवून घेऊन पाटील यांनी सावंत यांना झटका दिला होता. सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीचा मोठा निधी आपल्या भूम-परंडा मतदारसंघाकडे वळवला होता. त्याला आक्षेप घेत पाटील यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानंतर निधीचा निर्णय रद्द झाला होता. सावंत यांच्यासाठी हा दुसरा धक्का होता. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सावंत (Tanaji Sawant) यांना लोकसभा निवडणूक ही संधी होती.

ही संधी साधत मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी सावंत हट्टाला पेटले होते. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी तर प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर त्यांची डाळ शिजली नाही. आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढावी, अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका होती. मात्र पाटील यांनी त्यासाठी नकार दिला. त्यामुळे उमेदवार कोण? याचा निर्णय सातत्याने लांबणीवर पडत गेला.

Tanaji Sawant  News Dharashiv
VIDEO महायुतीत मिठाचा खडा; अजितदादांनी केली 'या' नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मतदारसंघ अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला, मात्र प्रा. बिराजदार यांचे नाव उमेदवारीच्या स्पर्धेतून मागे पडले. ऐनवेळी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पालकमंत्री सावंत यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. या निर्णयामुळे ते दुखावले गेले होते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवस ते शांत राहिले.

मध्येच अचानक त्यांनी पुन्हा हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडावा, अशी मागणी सुरू केली. त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शक्तिप्रदर्शन केले. यामुळे मोठी गडबड झाली. महायुतीत एकी नसल्याचा संदेश मतदारांमध्ये गेला. उमेदवारीचा निर्णय लांबत गेल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लढण्यासाठी महायुतीकडे उमेदवारच नाही, असा प्रचार महाविकास आघाडीकडून सुरू करण्यात आला होता.

पाटील आणि सावंत यांचे एकदाचे मनोमिलन झाले. अर्चनाताई यांच्या प्रचारात सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे सांगितले जाऊ लागले. एकमेकांचे चुलत भाऊ असलेले राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे राजेनिंबाळकर यांच्यात राजकीय वैर आहे. खासदार राजेनिंबाळकर यांचे वडील पवनराजे यांच्या हत्येनंतर हे वैर प्रचंड वाढले. सावंतांनी प्रचार सुरू केला आणि त्यांची विधाने, त्यांची भाषणे अर्चनाताई पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरू लागली.

जाणकारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

सावंत यांनी एका भाषणात खासदार राजेनिंबाळकर यांच्या वडिलांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. त्यावेळीच जाणकारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. सावंत नेमके कुणाचे काम करत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. कारण पवनराजे यांच्यावर टीका, त्यांचा एकेरी उल्लेख या बाबी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांच्यासाठी फायद्याच्या ठरणाऱ्या होत्या.

...अन् निवडणूक एकतर्फी होत गेली

पालकमंत्री असले तरी सावंत हे उमरगा-लोहारा तालुक्यात अद्याप एकदाही आलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते या तालुक्यांत फिरकले नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला. वडिलांवर टीका केल्यामुळे ओमराजे यांनी सावंतांचा चांगलाच पाणउतारा केला होता. निवडणुकीचा प्रचार मुद्द्यांवरून भटकला, तो नको त्या भावनिक मुद्द्यांवर गेला आणि चुरशीची होईल अशी वाटणारी निवडणूक एकतर्फी होत गेली. यासाठी सावंत यांची विधाने मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली.

दिग्गज नेते सोबत असल्यामुळे अर्चनाताई आणि राणाजगजितसिंह पाटील गाफील तर राहिले नव्हते ना? असा प्रश्न निकालानंतर उपस्थित झाला होता. ओमराजे यांचा 3 लाख 29 हजार मतांनी विजय झाला. यापैकी 81 हजार मतांची आघाडी एकट्या सावंत यांच्या भूम-परंडा विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती. सावंत यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात सावंत यांनी अनेक शत्रू निर्माण केले आहेत.

2019 च्या निवडणुकीत ओमराजे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांना 10 कोटी रुपये दिले होते, असे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होते. याचा अर्थ असा की 2019 मध्ये तत्कालीन खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कापण्यासाठी सावंत यांनी पुढाकार घेतला होता. सावंत हे उमरग्याला न येण्याचे हेही एक कारण असू शकते. महायुतीतील अजितदादा पवार यांच्या पक्षाशीही सावंतांनी शत्रुत्व घेतले आहे. आता राणाजगजतिसिंह पाटील यांच्याशीही त्यांचे बिनसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातीव विधानसभेची निवडणूक मोठ्या उलाथपालथींची ठरणार आहे. तसे पाहता, सावंत हे धाराशिव जिल्ह्यात बाहेरून आलेले आहेत. बाहेरून येऊन त्यांनी आपल्याला संपवण्याचा डाव आखल्याची भावना अनेक नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे. महायुतीतील पक्षांमध्ये एकीची भावना संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्याचा नेता कोण असेल, राणजगजितसिंह पाटील की डॉ. तानाजी सावंत? याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीत लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com