एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला असून फुलंब्रीतील नगराध्यक्ष पदाचा प्रमुख उमेदवार भाजपमध्ये दाखल झाला.
यापूर्वी जिल्हा महिला अध्यक्षांनी शिंदे गटाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात अस्थिरता वाढली आहे.
स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे होणारा हा ओढा राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे.
नवनाथ इधाटे
Phulambri Local Body Election News : राज्यात महायुती असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकमेकांचे नेते, पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये लागली आहे. यावरून महायुतीत तानातानी झाली, शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाह यांच्याकडे फोडाफोडी थांबवा, अशी विनंती केली. खरतर या दिल्लीवारीनंतर ही फोडाफोडी थांबायला हवी होती, पण ती अधिकच वाढल्याचे चित्र मराठवाडा आणि राज्यभरात दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कालच शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. चोवीस तास उलटत नाही तोच फुलंब्री नगर परिषदेत भाजपने शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला. एकूणच भाजप शिवसेनेला एकापाठोपाठ एक असे धक्के देत असून याकडे जिल्ह्यातील स्थानिक नेते, पालकमंत्री संजय शिरसाट हे मात्र उघड्या डोळ्याने फक्त पाहत आहेत.
फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत सोमवारी मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आनंदा किसन ढोके यांनी आपली उमेदवारी मागे घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. यासोबतच प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी दाखल केलेल्या त्यांच्या कन्या पूजा आनंदा ढोके यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला आहे. एकाच वेळी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने मतदानाआधीच शिंदेंच्या शिवसेनेला झटका बसल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून सतत जाणवणाऱ्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेतला असून फुलंब्रीच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षच योग्य पर्याय असल्याचा मला विश्वास आहे. आमदारा अनुराधा चव्हाण व जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे आनंदा ठोके यांनी स्पष्ट केले. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट समोर आहेत.
शिवसेना शिंदे गटाने नऊ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आतापर्यंत सहा उमेदवारांनी माघार घेतली असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील बाहेर पडल्यानंतर आता फक्त चार जागांवरच शिंदे गट शर्यतीत राहिला आहे. आनंदा ढोके यांनी सोमवारी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत छत्रपती संभाजीनगर भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांची लगेच भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
1. फुलंब्रीतील कोणता उमेदवार भाजपमध्ये दाखल झाला?
शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा प्रमुख उमेदवार भाजपमध्ये दाखल झाला.
2. शिंदे गटाला यामुळे किती नुकसान झाले?
स्थानीक नेतृत्व खिळखिळे झाल्याने निवडणूक व्यवस्थेत मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.
3. यापूर्वी कोणी पक्ष सोडला होता?
जिल्हा महिला अध्यक्षांनी राजीनामा देऊन शिंदे गटाला धक्का दिला होता.
4. भाजपकडे असा ओढा का वाढतोय?
स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणातील बदल व उमेदवारांना मिळणारा पाठिंबा हा मुख्य कारणांपैकी एक आहे.
5. या घडामोडींचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
भाजप अधिक मजबूत होण्याची शक्यता असून शिंदे गटाच्या विजयाची शक्यता कमी होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.