Raosaheb Danve-Harbhau Bagde-Vinod Patil Sarkarnama
मराठवाडा

BJP Politics Marathwada : हरिभाऊ बागडेंच्या फुलंब्रीत नव्या भिडूची एन्ट्री ?

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

Phulambri Assembly Constituency News : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेनाना यांची नुकतीच राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. बागडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छक राज्यस्थानला गेले होते. नानांच्या मतदारसंघाचा नवा वारस कोण? याची चर्चा आणि स्पर्धा रंगली असताना आता नवा ट्विस्ट समोर आला आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी झाली असतानाच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून इच्छूक असलेले विनोद पाटील यांचे नाव आता समोर येऊ लागले आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या मार्फत विनोद पाटील हे फुलंब्रीतून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत असल्याची जोरदार चर्चा आहे.

विनोद पाटील यांचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी चांगेल संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर फुलंब्रीतील भाजप विधानसभा इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. विनोद पाटील यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहता महाविकास आघाडीनेही त्यांच्याशी उमेदवारी संदर्भात संपर्क साधला असल्याची चर्चा आहे.

एकूणच हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्यानंतर फुलंब्रीतून आमदार होण्याचे स्वप्न रंगवणाऱ्या भावींना पक्षांतर्गत स्पर्धेसह बाहेरील इच्छुकांशीही स्पर्धा करावी लागणार असे दिसते. महायुती व महाविकास आघाडीच्या तंबूत या नव्या स्पर्धकाच्या चर्चेने घबराट पसरली आहे. फुलंब्रीतील आजी-माजी आमदार मतदार संघातून बाहेर पडल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आमदारकीसाठी जोर बैठका काढत आहेत.

महाविकास आघाडी व महायुती या दोघांकडेही इच्छुक उमेदवारांची फौज तयार आहे. त्यामुळे पक्षाचे तिकीट फायनल करताना पक्षाच्या नाकीनऊ येणार आहेत. गटातटाच्या राजकारणात आपल्या हक्काचे सीट जाऊ नये म्हणून महायुती व महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे. यामुळे महायुती-महाविकास आघाडीतील इच्छुकांची धडधड मात्र वाढली आहे.

विनोद पाटील यांच्यासाठी सगळेच पक्ष पायघड्या घालत असल्याने ते नेमका काय निर्णय घेतात? यावर फुलंब्री मतदारसंघाचे चित्र ठरणार, असे दिसते. त्यामुळे आधी हरिभाऊ बागडे यांना 2024 मध्ये उमेदवारी मिळू नये म्हणून देवाचा धावा करणाऱ्या भाजपच्या इच्छूकांवर पुन्हा देवाला साकडे घालण्याची वेळ आली आहे.

हरिभाऊ बागडे राजस्थानला राज्यपाल म्हणून गेल्यानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फुलंब्रीत लक्ष घालायला सुरुवात केली आहे. कालच्या त्यांच्या फुलंब्री दौऱ्यात विनोद पाटील आणि रावसाहेब दानवे हे एकाच गाडीत प्रवास करत होते. पाटील यांच्याकडून महायुती की महाविकास आघाडी? याची चाचपणी सुरू असल्याचे समजते. रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांचा वावर पाहता ते भाजपकडून लढण्यास पसंती देतील, असे बोलले जाते.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरला होता. मराठवाड्यात संभाजीनगर वगळता जिल्ह्यातील सातही लोकसभा मतदारसंघात तो महायुतीच्या विरोधात गेला होता. विधानसभेला हा मुद्दा किती प्रभावी ठरतो? मनोज जरांगे पाटील विधानसभेला उमेदवार उभे करतात का? याकडे लक्ष ठेवूनच पुढील निर्णय त्यांच्याकडून घेतला जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT