Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या संभाजीनगर `पुर्व` मतदार संघात अखेर एमआयएम ने माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरा इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी यांचा पंतग कापल्यानंतर आता पुर्व ची `दोर` इम्तियाज जलील याच्या हाती आली आहे. कादरी यांनी आठवडाभरापूर्वी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
दोन वेळा पूर्व विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे (AIMIM) उमेदवार राहिलेले कादरी यांनी अतुल सावे यांना चांगली लढत दिली होती. थोडक्यात पराभव झाल्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवून आमदार होण्याचे स्वप्न कादरी पहात होते. मात्र सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात काम केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
यासंदर्भातला सविस्तर अहवाल पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. तेव्हापासून कादरी यांना पक्षातून `साईड ट्रॅक` करण्यात आले होते. अखेर विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर कादरी यांनी इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. इम्तियाज जलील हे देवेंद्र फडणवीस यांची `बी टीम` असून ते त्यांचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप कादरी यांनी केला होता.
यावर मौन बाळगणाऱ्या इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी थेट आता पूर्व मतदार संघात उडी घेत कादरी यांना कायमचे घरी बसवण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना विजयी खासदार संदिपान भुमरे यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने मुस्लिम मतदान वळले असताना संभाजीनगरात मात्र मुस्लिम मतदार एमआयएमच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले होते.
त्यामुळे पूर्व आणि मध्य या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवण्याची रणनीती असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी आखली होती. त्यानुसार महिनाभरापूर्वी संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या ओवेसी यांनी राज्यातील पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानातून केली होती. यावेळी इम्तियाज जलील हे विधानसभा लढवणार हे जाहीर करण्यात आले होते, मात्र ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याचा `सस्पेंन्स` कायम ठेवण्यात आला.
तिसरा पराभव टळणार?
तो का ठेवण्यात आला होता याचे उत्तर गफ्फार कादरी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्पष्ट झाले. कालपर्यंत इम्तियाज जलील यांनी ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याबद्दलची स्पष्टता केली नव्हती. माध्यमांना ते मी वैजापूर मधून उमेदवारी अर्ज घेतला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून ही माझी तयारी सुरू आहे, असे सांगत दिशाभूल करत होते. अखेर काल रात्री उशिरा इम्तियाज जलील हे पूर्व विधानसभा मतदारसंघातून मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले.
2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकीत एमआयएम चा या मतदारसंघात थोडक्यात पराभव झाला होता. 2014 मध्ये कादरी यांनी तब्बल 60 हजार 268 मते घेतली होती. या अटीतटीच्या सामन्यात भाजपच्या सावे यांनी 5 हजार 364 मतांनी विजय मिळवला होता. 2019 मध्ये दुसऱ्यांदा कादरी यांना मैदानात उतरवले गेले. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या सावे यांना चांगली लढत देत तब्बल 80 हजार मते मिळवली. तरी सावे यांनी 13 हजार 930 मतांच्या फरकाने एमआयएमचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला.
तीन वेळा पराभूत झालेल्या पूर्व विधानसभा मतदारसंघात एमआयएम ने यावेळी नवी खेळी केली आहे. माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या इम्तियाज जलील यांना उमेदवारी देत महायुती तसेच महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. इम्तियाज जलील यांचा राजकीय अनुभव आणि डावपेच आखण्यात असलेली हातोटी पाहता यावेळी पूर्व मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम उमेदवार देणे टाळले.
गफ्फार कादरी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचे शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र पक्षाने या मतदारसंघात मराठा उमेदवारावर विश्वास दाखवला. एम. के देशमुख यांना उमेदवारी देत मराठा कार्ड वापरल्याने काँग्रेसने मुस्लिमांवर अन्याय केला अशी भावना पक्षात वाढू लागली आहे. यातून बंडखोरीचा धोका संभवतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे वळलेला मुस्लिम मतदार इम्तियाज जलील यांच्यामुळे पुन्हा एमआयएमच्या पाठीशी उभा राहतो का? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. एकूणच इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीने पूर्व विधानसभा मतदारसंघाची लढत तिरंगी होणार हे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.