Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून सुरू असलेली स्पर्धा अखेर आज एम. के. देशमुख यांच्या उमेदवारीनंतर संपली आहे. एम. के. देशमुख या नव्या चेहऱ्याला संधी देत काँग्रेसने भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघात मराठा कार्ड टाकल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्व मतदार संघात एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर काँग्रेस या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देत लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी होणारी टीका टाळणार, अशी चर्चा होती.
एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेस मधून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. (Congress) गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एम. के. देशमुख गफार कादरी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक दिल्लीत तळ ठोकून होते. `पूर्व` मध्ये पहिल्यांदा उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा दिसली. उमेदवारीच्या या स्पर्धेत अखेर माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी बाजी मारली.
शासकीय सेवेत शिक्षणाधिकारी म्हणून या क्षेत्रामध्ये आपला दबदबा आणि राजकीय नेत्यांमध्ये उठबस असलेल्या देशमुख यांना उमेदवारी मिळवण्यात त्यांचे हेच राजकीय संबंध कामाला आल्याची चर्चा त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सुरू झाली आहे. नुकतेच शिक्षणाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले एम.के. देशमुख पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन आठवड्यांपासून सक्रिय झाले होते. मतदार संघातील बॅनरबाजी मधून त्यांनी आपल्या नावाची चर्चा घडवून आणण्यात यश मिळवले.
एवढेच नाही तर केवळ काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीतील घटक पक्षातील इतर उमेदवार शर्यतीत असताना देशमुख यांनी उमेदवारी पदरात पाडून घेतली. यावरून त्यांची राजकीय ताकद दिसते. मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्यासमोर यानिमित्ताने महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्याची चर्चा पूर्व मतदार संघात सुरू झाली आहे. एमआयएम मधून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरलेले गफार कादरी आता काय भूमिका घेतात? यावर पूर्व मतदार संघातील लढत तिरंगी होणार की चौरंगी? हे ठरणार आहे.
दुसरीकडे एमआयएम ने गफार कादरी यांच्या पक्ष सोडल्यानंतर या मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद मध्य मतदार संघात माजी खासदार इम्तियाज जलील लढणार अशी चर्चा असताना असदुद्दीन ओवेसी यांनी तिथे गेल्या निवडणुकीत लढलेले नासेर सिद्दिकी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूर्व मध्ये एमआयएम कडून इम्तियाज जलील लढणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आपण लढणार असल्याचे जाहीर केलेल्या इम्तियाज जलील यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघातूनही उमेदवारी अर्ज घेतल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर असल्याने येत्या दोन दिवसात इम्तियाज जलील कोणत्या मतदारसंघातून लढणार? हे स्पष्ट होईल. एकूण एमआयएम मधील हालचाली पाहता पूर्व मतदार संघात इम्तियाज जलील लढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य मतदारसंघात नासेर सिद्दिकी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इम्तियाज जलील यांच्या पूर्व मधील उमेदवारीची आता औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जाते. शहरातील पूर्व आणि मध्य या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना महायुतीचे विजयी झालेले खासदार संदिपान भुमरे यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य होते. या जोरावरच एमआयएम ने या दोन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मंत्री अतुल सावे यांनी 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. यावेळी ते विजयाची हॅट्रिक साधतात की मग एमआयएम, वंचित आणि काँग्रेस चा उमेदवार त्यांचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2004 आणि त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या अनुक्रमे कल्याण काळे आणि राजेंद्र दर्डा यांनी विजय मिळवलेला आहे. 2014 मध्ये मात्र भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला.
अतुल सावे यांनी एमआयएम, काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन विरोधकांना धूळ चारत चार हजार दोनशे साठ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती असल्यामुळे अतुल सावे यांचा विजय सोपा होईल, असे वाटत असताना एमआयएम ने त्यांना तगडी फाईट दिली. त्यानंतरही अतुल सावे 14 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या अतुल सावे यांना पूर्व मध्ये हॅट्रिक साधता येते का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.