Killari Earthquake Sarkarnama
मराठवाडा

Earthquake@1993 : भूकंपाच्या आठवणींनी ३० वर्षांनंतरही काळजाचा थरकाप उडतो...

Killari News : त्याच्या समन्यायी वितरणाची व्यवस्था डॉ. पद्मसिंह पाटील आणि विलासराव देशमुख यांनी आपापल्या भागात लावून दिली होती.

Vijaykumar Dudhale

Latur News : किल्लारीच्या भूकंपाने जिवाभावाचे अनेक मित्र, अनेक आप्तस्वकीय हिरावले होते. कुणाकुणाकडे लक्ष द्यावे हे समजत नव्हते, कारण सगळेच संकटात होते. जिल्हा परिषदेच्या माझ्या बलसूर मतदारसंघातील सर्व १२ गावे नामशेष झाली होती. कधीही भरून न येणाऱ्या या प्रलयंकारी भूकंपामुळे झालेल्या हानीचे स्मरण ३० वर्षांनंतरही काळजाचा थरकाप उडवणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष (अजित पवार गट) प्रा. सुरेश बिराजदार सांगत होते. भूकंपाच्या पहिल्या दिवसापासून ते मदतकार्यात सक्रिय होते. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव, त्यांनी केलेले काम त्यांच्याच शब्दांत. (Even after 30 years, the memories of the earthquake still make me shudder...)

भूकंप झाल्यानंतर काही वेळेतच आम्ही सास्तूरला पोचलो होतो. तेथील चित्र प्रचंड भयावह, काळीज पिळवटून टाकणारे होते. ढिगाऱ्यांखाली दबून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींकडे पाहण्यासाठी वेळच नव्हता. कारण जखमींचा जीव वाचवणे, हेच प्राधान्याचे होते. त्यामुळे जखमींना बाहेर काढून त्यांना मिळेल त्या वाहनांतून उमरग्याला शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसह उमरगा शहरातील सर्व खासगी डॉक्टरांनी अहोरात्र जखमींवर उपचार केले. तोपर्यंत मुख्यमंत्री शरद पवार हे भूकंपग्रस्त भागात दाखल झाले होते. ते शेजारच्या गावांत होते. मात्र, त्यांना भेटण्यासाठी आमच्याकडे वेळच नव्हता.

शरद पवार यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावांची, तर विलासराव देशमुख यांच्यावर लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावांची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे मदतकार्याला शिस्त लागली होती. हे दोघेही कॅबिनेट मंत्री दिवसरात्र काम करत होते. पहिल्या दिवशी जखमी आणि बचावलेल्या लोकांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मदतकार्यातील कार्यकर्तेही उपाशीच होते. सर्वच उद्‌ध्वस्त झाल्यामुळे स्वयंपाक करायचा कसा? ही मोठी समस्या होती.

डॉ. पद्मसिंह पाटील यांनी तातडीने हालचाली केल्या. बसवकल्याण, बिदर, आळंद, गुलबर्गा (कलबुर्गी) आदी कर्नाटकमधील शहरांतून ट्रकच्या ट्रक भरून केळी मागवण्यात आली. पाण्याचे टँकरही मागवण्यात आले. मृतदेह झाकण्यासाठी कापडही उपलब्ध नव्हते. एवढी मोठी आपत्ती कोसळल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. दुकाने उघडायला लावून कापड आणून मृतदेह झाकण्यात आले.

दररोज पहाटे साडेपाच ते सहा या वेळेत डॉक्टर साहेबांचा (पद्मसिंह पाटील) घरी लँडलाइनवर कॉल यायचा. सुरेश तयार झाला का?, अशी विचारणा झाली की आम्ही अवघ्या काही मिनिटांत तयार होत असू. डॉक्टरांसोबत त्यांच्या जिप्सी गाडीत मी आणि बाबा पाटील कायम असायचो. आम्ही सर्वजण ते दिवस बिस्किटांवरच काढायचो. लातूर जिल्ह्यातील गावांत विलासराव देशमुख आणि त्यांचे सहकारी प्रचंड मेहनत घेत होते. प्रत्येक गावात जाऊन हे दोघेही पाहणी करायचे. त्यामुळे तुटवडा असलेल्या वस्तू, पदार्थांचा तातडीने पुरवठा व्हायचा. हळूहळू जेवणाचा प्रश्न सुटू लागला. स्वयंसेवी संस्था दाखल झाल्या.

सोलापुरातूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ येऊ लागले होते. त्याच्या समन्यायी वितरणाची व्यवस्था डॉक्टर आणि विलासराव देशमुख यांनी आपापल्या भागात लावून दिली होती. राज्याचे सचिवही उमरग्यात ठाण मांडून होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांची त्यांनी तंतोतंत अंमलबजावणी केली. मदतकार्यावर योग्य देखरेख व्हावी; म्हणून प्रत्येक गावासाठी एक तहसीलदार-उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला होता.

भूकंपाचे संकट कमी की काय म्हणून पाऊसही सुरू झाला. मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला होता. लष्करातील जवानांच्या मदतीने मृतदेह लवकर बाहेर काढण्यात आले. त्यामुळे रोगराईचा धोका टळला. शासकीय आणि खासगी डॉक्टरांनी त्यावेळी दिलेले योगदान कधीही विसरता येण्यासारखे नाही. नंतर दुसऱ्या दिवसापासून राज्यभरातील डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी दाखल झाले. आता राज्यभरातून आलेल्या बघ्यांची गर्दी वाढू लागली होती. मदतकार्यात अडथळे निर्माण होऊ लागले. त्यामुळे रस्ते बंद करण्यात आले. स्वयंसेवी संस्था आणि मदतकार्य करणाऱ्यांनी तहसील कार्यालयातून पास घ्यावा लागायचा. हे काम कटकटीचे होते, पण बघ्यांची गर्दी कमी करण्यासाठी त्याला पर्याय नव्हता.

मुख्यमंत्री शरद पवार हे जागेवरच निर्णय घ्यायचे. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे तातडीने मार्गी लागायची. लोक समस्या आम्हाला सांगायचे, आम्ही त्या पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुखांना सांगायचो. ते दोघे शरद पवारांना कळवायचे. ही साखळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत होती. दरम्यानच्या काळात तात्पुरत्या निवाऱ्यांची उभारणी सुरू झाली होती. काही दिवसांतच पक्क्या घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. मुख्यमंत्री शरद पवार यांचे कणखर नेतृत्व, त्याला मिळालेली पद्मसिंह पाटील, विलासराव देशमुखांची साथ आणि स्वयंसेवी संस्था, आरोग्य यंत्रणेने केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे या महाप्रलयंकारी आपत्तीवर मात करणे शक्य झाले. असे असले तरी जिवाभावाच्या लोकांना गमावल्याचे दुःख कायम राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT