Killari Earthquake Thirty Years : काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या अन्‌ मृतदेहांचे ढीग…; कार्यकर्त्यांसाठी ती शेवटची पहाट ठरली...

Killari Earthquake News : तेवढ्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा ताफा आला...
Killari Earthquake Thirty Years News
Killari Earthquake Thirty Years NewsSarkarnama
Published on
Updated on

किल्लारी-सास्तूर (जि. लातूर) परिसराचे ‘होत्याचे नव्हते’ करणारी ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट महाराष्ट्रातील एकही माणूस विसरू शकणार नाही. कारण, तब्बल ६.४ रिश्टर स्केलच्या महाप्रलयंकारी भूकंपाने मोठमोठं वाडे, माळवदं (मातीचं घरं) जमीनदोस्त केली होती. त्या भूकंपात तब्बल १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. त्या भूकंपाला आज (ता. ३०) तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ‘सरकारनामा’ने घेतलेला हा आढावा. उमरगा येथील छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर इस्माईल शेख हे उमरग्याहून भूकंपग्रस्त भागात तातडीने पोचले होते. त्यावेळी त्यांनी तिथं काय पाहिलं, हे त्यांच्याच शब्दांत… (Thirty Years of the Killari Earthquake)

पुणे-मुंबईसारख्या शहरी भागातील श्री गणेशाच्या मिरवणुका संपत आलेल्या होत्या. आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देऊन ग्रामीण महाराष्ट्रातील थकलेले भक्तगण पहाटेच्या साखरझोपेत होते. काही ठिकाणी मिरवणुका सुरू होत्या. पण, किल्लारी आणि सास्तूर परिसरातील काही कार्यकर्त्यांसाठी ती शेवटची पहाट ठरली. कारण, ३० सप्टेंबर १९९३ ची ती पहाट काळजाचा थरकाप उडवणारी आणि आपल्या उदरात भयंकार बातमी घेऊन आली होती.

Killari Earthquake Thirty Years News
Ravi Rana on Sharad Pawar: शरद पवार मोदींना पाठिंबा देणार... ; आमदार रवी राणांचे भाकीत, राजकारणात काहीही शक्य...

बाप्पाला निरोप देऊन काही लोक घरी येत होते. उमरगा (जि. धाराशिव) शहरात काही ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. मीही मिरवणूक पाहून साधारणतः मध्यरात्री बाराच्या सुमारास घरी पोचलो होतो. पण, थोड्याच वेळात जमिनीतून एक प्रकारचा आवाज यायला लागला. कुणीतरी आपले घर जणू ओढून नेत आहे, असं वाटलं. ती पहाटे पावणे चारची वेळ असावी. झोपेतून उठून पाहतोय, तर गल्लीत आरडाओरड सुरू झाला होता. सर्व नागरिक घरांतून रस्त्यांवर आले होते. प्रत्येकजण अंदाज लावत होता, हा भूकंप असावा.

उमरग्याच्या पोलिस निरीक्षकांचे प्रसंगावधान

किल्लारी परिसराला एक वर्षापूर्वी १८ ऑक्टोबर १९९२ रोजी संध्याकाळी साधारणतः सात ते आठच्या दरम्यान भूकंपाचा एक सौम्य धक्का बसला होता. त्याची आठवण येताच माझ्यासह काही नागरिकांनी सरळ पोलिस ठाणं गाठलं. काही लोक आमच्या आधी पोचले होते. उमरग्याचे पोलिस निरीक्षक जेम्स आंबिलढगे कर्मचाऱ्यांना बोलवून सूचना देत होते. त्यावेळी आजच्या सारखी दळणवळणाची साधनं नव्हती. जेम्स आंबिलढगे यांनी उमरगा बसस्थानक प्रमुखांशी संपर्क साधून डेपोमध्ये उपलब्ध असतील त्या सर्व बस पोलिस ठाण्याला मागवून घेतल्या. वाहने विविध गावांना पाठवण्यात आली होती. तोपर्यंत पाच वाजून गेलेले होते. एव्हाना किल्लारी परिसरात भूकंप झाल्याचे परिसरातील गावांत वाऱ्यासारखे पसरले होते.

गाव कुठाय, हेच समजेना

साधारणः साडेपाचची वेळ असावी. उमरगा येथून बचावकार्यास निघालेली आमची पहिली टीम सरळ भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या एकोंडी या गावाकडे निघाली. सात ते सव्वासातपर्यंत आम्ही गावात पोचलो. पाहतो तर संपूर्ण गाव गडप झालेलं होतं. मोठंमोठे वाडे पडले होते. गावात सर्वत्र धूळ आणि माती उडत होती. लोकांचा आक्रोश कानावर पडत होता. कसेबसे आम्ही तेथे पोचलो. पण, गाव कोठे आहे, हे आम्हालाही समजत नव्हते. धाडस करून आम्ही दगड-मातीच्या ढिगाऱ्यापर्यंत पोचलो. पण, काय करावं, हे कोणालाही कळत नव्हतं. स्थानिकांना आपलं घर कुठं आहे, याचा अंदाज येत नव्हता. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांच्या किंचाळ्या मात्र ऐकू येत होत्या.

शोधकार्यात पावसाचा अडथळा

धाडस करून आम्ही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि निसर्गाने रौद्रावतार दाखविण्यास सुरुवात केली. धो धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि तो सलग तीन दिवस कोसळत होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही शक्य तेवढ्या लोकांना माती-दगडाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. जखमींना ट्रकमधून उमरगा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. हे शोधकार्य सुरू असतानाच पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचविण्यास आम्ही प्राधान्य दिले. दगड माती काढण्यासाठी काहीही साधनं नसताना आम्ही हातांनी ढिगारे उकरून अनेकांचे प्राण वाचवले. दगड-मातीखाली अडकलेले अनेकजण आम्हाला वाचवा म्हणून ओरडत होते, परंतु साधनं नसल्यामुळे आम्हास ते शक्य झाले नाही. काहींनी आमच्यासमोर जीव सोडला. पण, नियतीसमोर आम्हीही हतबल होतो, दुर्दैवी ठरत होतो...

Killari Earthquake Thirty Years News
Kiran Samant News : उदय सामंत यांच्या भावाच्या 'मशाली'वरून शिंदे गटात 'आग'; 'जो भी हो देखा जायेगा', उदय सामंताच्या करिअरमुळे माघार...

सकाळी आठलाच मुख्यमंत्री भूकंपस्थळी हजर

त्यावेळी माझ्याकडे व्हिडिओ कॅमेरा होता, शोध आणि मदतकार्य करतानाचे मी चित्रण केलं. एकोंडीत शक्य तेवढी मदत करून जखमींना उमरग्याला पाठवल्यानंतर मी दुचाकीवरून किल्लारीला पोचलो. किल्लारीची परिस्थिती पाहिली आणि पुढे जाण्याचं माझे धाडसच झालं नाही... चौकात आजूबाजूला मृतदेह पडले होते. लोक मदतकार्य करत होते. तोपर्यंत माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली होती. मी परत उमरगा गाठण्याच्या प्रयत्नात होतो. साधारण सकाळी आठची वेळ असेल. तेवढ्यात समोरून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा ताफा आला. स्थानिकांशी संवाद साधून ते लागलीच पुढच्या गावाला निघाले.

मी किल्लारीहून सास्तूरला पोचलो. शाळेच्या आवारात ठेवलेले मृतदेह पाहून मन हेलावून गेले. मुख्यमंत्री पवार आधीच सास्तूरला येऊन गेले होते. कॅमेऱ्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी मी सास्तूरहून परत उमरगा येथे आलो. बॅटरी चार्ज करून शासकीय रुग्णालयात पोचलो. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आमच्या गाडीतील जखमींना अगोदर घ्या, अशा विनवण्या केल्या जात होत्या. शासकीय रुग्णालय आणि उमरग्यातील सर्व खासगी रुग्णालयातील डॉक्टर जखमींवर उपचार करत होते. रुग्णालयाच्या आवारात मृतदेह ठेवले जात होते. पुरुष, महिला, लहान मुले अशी विभागणी केली जात होती.

Killari Earthquake Thirty Years News
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे साहेब धाब्यावर या ना! तारीख ठरली, खासदार मेंढेंना दिले निमंत्रण...

....अन्‌ पायाखालची जमीनच सरकली

सास्तूरला माझी बहीण आणि मेहुणे राहायचे. भूकंपात मेहुणे गेल्याचा निरोप मिळाला आणि पायाखालची जमीनच सरकली. मी तातडीने पुन्हा सास्तूरला पोचलो. तेथील मृतदेहांमधून मेहुण्याचा मृतदेह शोधून काढला. एकीकडे बहीण आणि तिची मुलं रडत बसलेली होती. काय करावे कळत नव्हते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तोपर्यंत बऱ्याच शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचे लोक भूकंपग्रस्त गावांमध्ये पोचत होते. शासकीय यंत्रणेची परवानगी घेऊन मी माझ्या मेहुण्याचा मृतदेह माझ्या गावी नेला आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

इस्माईल शेख (शम्स), (उमरगा, जि. धाराशिव)

Killari Earthquake Thirty Years News
Arvind Kejriwal News : केजरीवाल-मोदींमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; म्हणाले, 'चौथी पास राजाकडून काय अपेक्षा ठेवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com