Devendra Fadnavis-Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde News : पंकजाताईंचा होमपिचशी असलेला संपर्क तुटतोय...तर फडणवीसांचा ‘कनेक्ट’ वाढतोय....!

भाजपमधील काही नेत्यांना पंकजा मुंडे डोईजड वाटत असतीलही. मात्र, या मंडळींकडून केल्या जाणाऱ्या खेळ्यांमुळे पंकजा मुंडेंचा टच अधिकच कमी कमी होत आहे.

Datta Deshmukh

बीड : पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) भाजपकडून (BJP) टाळले जात आहे, त्या पक्षावर नाराज आहेत, अशा चर्चा त्यांच्या विधानसभेतील पराभवानंतर सातत्याने सुरु आहेत. मात्र, स्वत:चे होमपीच असलेल्या बीड (Beed) जिल्ह्याकडे पंकजा मुंडे यांचे पाहिजे तेवढे लक्ष व टच नाही, हेही वास्तव आहे. पंधरवाड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जिल्ह्यात दोनदा आले. मात्र, पंकजा मुंडे जिल्ह्यातून जाऊन तीन आठवडे लोटले आहेत. (Fadnavis' two visits to Beed in 15 days; But Pankaja Munde did not return even after a month!)

राजकारणात जय-पराजय गौण असतो. अनेक नेते आमदार, मंत्रीही होतात. परंतु, प्रत्येकजण नेता होऊ शकत नाही. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा व स्वकर्तृत्व या जोरावर पंकजा मुंडे राजकीय नेत्या आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात आणि राज्यात त्यांना माणणारा मोठा वर्ग असल्याने त्या आजही ‘मास लिडर’ म्हणून ओळखल्या जातात. मात्र, पराभवानंतर त्यांचा पक्ष व जिल्ह्याशी टच काहीसा कमी होत आहे, हे मात्र खरे. भाजपमधील काही नेत्यांना पंकजा मुंडे डोईजड वाटत असतीलही. मात्र, या मंडळींकडून केल्या जाणाऱ्या खेळ्यांमुळे पंकजा मुंडेंचा टच अधिकच कमी कमी होत आहे. त्यांच्या पराभवाला पक्षातील काही नेत्यांचा हातभार होता, असा समर्थकांचा आरोप आहे.

विधानसभेतील पराभवानंतर विधान परिषद, राज्यसभेसाठीही पंकजा मुंडेंना टाळले गेले. त्यांच्याच कधीकाळच्या दुसऱ्या फळीतील समर्थकांना संधी देऊन मुंडेंचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा पंकजा यांच्या समर्थकांच्या म्हणण्यात तथ्यही आहे. मात्र, संविधानिक किंवा पक्षाचे पद असो वा नसो राजकीय नेता म्हटले की त्या नेत्याची पक्षीय संघटना व ग्राऊंडवर कायम टच असणे महत्वाचे आहे. मात्र, हा टच सैल झाल्यानेच पंकजा मुंडेंच्या अपरोक्ष अनेक निर्णय होऊ लागले आहेत.

पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यातील एकही आमदार त्यांच्या मर्जीविना कोणालाही भेटण्याचे धाडस करत नसे. आता मात्र प्रत्येकाने आपली स्वतंत्र वाट तयार केली आहे. कोविड काळातील निर्बंधामुळे त्यांच्यावर जिल्ह्यात यायला भलेही बंधने होती. त्यानंतरही त्यांचा जिल्ह्यातला वावर म्हणावा तेवढा नाही. सध्या राज्यात त्यांचा पक्ष सत्तेत असूनही सत्ताकारणापासून त्या काहीशा ‘सुरक्षित अंतरावर’ आहेत.

इकडे जिल्ह्यातदेखील त्यांना माणणारा वर्ग आहे, सामान्यांपर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे अनेक मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांच्या अधारे त्यांना लोकांमध्ये जायची असलेली संधी त्या दवडत आहेत. त्यामुळे दुसऱ्या फळीतील भाजप नेते व पंकजा मुंडे यांना मानणारा घटकदेखील अस्वस्थ आहे. भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांकडून त्यांना टाळण्याचा किंवा खच्चीकरणाचा प्रयत्न होत असला तरी लोकांमध्ये मिसळून आपले ‘लोकनेतेपण’ व आपल्यामागील सामान्यांची ताकद कायम असते, हे त्या पक्षांतर्गत विरोधकांना दाखवू शकतात.

नगर परिषदा व जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधीही लागू शकतात. लोकसभाही १६ महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना त्यांचा असा हा दुरावा त्यांच्यासाठी चांगला नाही. भाजपमधील त्यांच्या पक्षीय विरोधकांना मात्र तेच हवे आहे. त्यांच्याजवळील व एकेकाळी त्यांच्या नजरेच्या इशाऱ्याबाहेर नसणाऱ्या एकेकाला त्यांच्या पक्षीय विरोधकांनी कधीच जवळ केले आहे. त्यांना भविष्यात काहीही निर्णय घ्यायचा असला तरी लोकांसोबतची नाळ लोकसंपर्काने होती तशीच घट्ट ठेवण्याऐवजी पंकजा मुंडे मात्र सर्वच घटकांपासून दूर राहणे का पसंत करत आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे.

डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर २१ तारखेला त्यांनी नूतन सरपंच व उपसरपंचाचंचे सत्कार केल्यानंतर गेलेल्या पंकजा मुंडे अद्याप बीड जिल्ह्यात आलेल्या नाहीत. स्वत:च्या जिल्ह्यात मुंडे येऊन तीन आठवडे उलटलेले असताना देवेंद्र फडणवीस मात्र पंधरवाड्यात दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात येऊन गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT