औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडमधील जाहीर सभेच्या चर्चे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात येवून सभा घेऊन दाखवा हे आव्हान आदित्य ठाकरेंनी स्वीकारले आणि सभा घेण्याचेही ठरवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तार यांनी ७ नोव्हेंबरलाच खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडमध्ये ठेवली.
नगरपरिषदेची सत्ता हातात असल्याने समोरील मैदानाची परवानगी देखील मिळवली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेला ते मैदान नाकारण्यात आल्यानंतर पर्याय म्हणून आंबेडकर चौकातील मोकळ्या मैदानात सभेला परवानगी देण्यात आली. (Shivsena) पण रात्रीतून सुत्रे हलली आणि सभा रद्द होऊन आता सिल्लोडमध्ये फक्त सत्कार आणि लिहाखेडी भागात शिवसंवाद यात्रा असा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. आदित्य ठाकरे यांची सभा रद्द झाल्याने सत्तारांकडून आता त्यांच्यावर रणछोडदास अशी टीका होवू लागली आहे.
मुळात आदित्य ठाकरेंच्या सिल्लोड दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचेच हे अपयश म्हणावे लागेल. मुळात ज्या सिल्लोमध्ये शिवसेनेची ताकद नाही, तिथे सभा घेण्याची घोषणाच घाईत करण्यात आली. सभेसाठी गर्दी जमवण्याचे मोठे आव्हान असतांना त्याचे कुठलेच नियोजन जिल्ह्यातील नेत्यांनी केले नाही. तर सिल्लोडमध्ये बोटावर मोजण्याइतके जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते आर्थिकदृष्ट्या तर कुमकुवत आहेच, पण गर्दी जमवणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम होते.
अशावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी सिल्लोडमध्ये ठाण मांडून तयारी करणे अपेक्षित होते. पण मिडियावर प्रतिक्रिया देण्यात दंग असलेल्या याच स्थानिक नेत्यांमुळे आता आदित्य ठाकरे तोंडघशी पडले आहेत. ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा होणार, शिवसंवाद यात्रा काढणार हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वप्रथम जाहीर केले होते. यावर पक्षातील एकही नेता अद्याप बोलला नव्हता. दानवे यांनी आदित्य ठाकरेंचा जिल्ह्यातील दौरा जाहीर केल्याचा त्यांना राग होता, की मग दानवेंनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर दौऱ्याची घोषणा केली होती? असा प्रश्न आता उपस्थीत केला जात आहे.
आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा होवू नये, त्यांना मैदान मिळू नये यासाठी सत्तार प्रयत्न करणार हे उघडच होते. मग त्याला शह देण्याचा प्रयत्न माध्यमांसमोर सत्तारांना आव्हान देणाऱ्या जिल्ह्यातील नेत्यांना का केला नाही? हा खरा प्रश्न आहे. आदित्य ठाकरे यांची सभा जाहीर होताच सत्तार यांनी ज्या त्वेषाने मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा आयोजित केली, तसा उत्साह किंवा तयारी आदित्य ठाकरेंच्या सभा किंवा दौऱ्याची दिसली नाही. त्यामुळे लढण्याआधीच शिवसेनेने शस्त्र खाली ठेवले की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
तिकडे सत्तार यांनी ठाकरे यांची सभाच काय, पण त्यांना सिल्लोडमध्ये येवूच द्यायचे नाही, अशी यंत्रणा कामाला लावल्याचे दिसून येते. ज्या लिहाखेडी भागात आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा काढली जाणार आहे, त्याला गर्दी जमवण्यासाठी सिल्लोडमधील जे मोजके पदाधिकारी गाड्या फिरवत आहेत, त्यांच्या मागे सत्तारांनी आपल्या गाड्या लावल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यापासून सगळी यंत्रणा हलवण्यात सत्तार जितके माहिर आहेत ते पाहता शिवसेनेचा त्यांच्यापुढे टिकाव लागणार नाही? हेच यावरून स्पष्ट होते.
ठाकरेंसारखा मोठा नेता सभेला येत असतांना जर गर्दी जमली नाही, तर हसे नको म्हणून आता सभा रद्द करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ज्या आंबेडकर चौकात सभा होणार म्हणून सिल्लोडमध्ये काल बॅनर झळकले होते, त्याच चौकात आता आदित्य ठाकरेंचा छोटेखानी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकंदरित आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड दौरा फसला असेच म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.