AIMIM Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

AIMIM News : शिरसाट-इम्तियाज वाद पेटला; महसूल अधिकार्‍यांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची एमआयएमची मागणी!

MIM leaders to submit a memorandum to the Divisional Commissioner, demanding the filing of an atrocity case against concerned revenue department officials. : जर त्या शब्दाच्या उल्लेखाने माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असेल तर मग शासन, संबंधित महसूल विभाग आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर देखील ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : शासकीय आदेशावर 'हरिजन' असा उल्लेख करणाऱ्या संबंधित सर्व महसूल अधिकार्‍यांविरूद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन एमआयएमच्या वतीने विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात काही संघटनांनी 'हरिजन' या शब्दाचा हेतुपुरस्पर वारंवार उल्लेख करत आंबेडकरी जनतेचा अवमान केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यावरून इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

यावर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी स्पष्टीकरण देताना 'मी फक्त शासनाचा कागद आणि त्यावर करण्यात आलेला उल्लेख फक्त वाचून दाखवला. जर त्या शब्दाच्या उल्लेखाने माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत असेल तर मग शासन, संबंधित महसूल विभाग आणि त्यांच्या अधिकार्‍यांवर देखील ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे', अशी भूमिका मांडली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर कुटुंबीयांच्या नावे बेकायदेशीर मालमत्ता खरेदीचा आरोप करताना इम्तियाज जलील यांनी एका वर्ग दोनच्या सरकारी जमिनीचा उल्लेख करताना 'हरिजन' हा शब्द उच्चारला होता.

त्यानंतर संतप्त झालेल्या आंबेडकरी संघटनांनी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रारी दाखल करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान संजय शिरसाट (Sanjay Shirsat) समर्थक आणि शहरातील आंबेडकरी संघटनांनी येत्या 23 जून रोजी इम्तियाज जलील यांच्या अटकेच्या मागणीसह त्यांना हद्दपार करावे यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे.

इम्तियाज जलील यांच्या विरोधात वातावरण तापत असतानाच काल सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट का केली? अशी विचारणा करत चार ते पाच समर्थकांनी संजय शिरसाट यांच्या समर्थकांना मारहाण केली. यावरून दोघांच्याही समर्थकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. परस्पर विरोधी तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकूणच संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यातील वादाने आता टोक गाठले आहे.

ज्या शब्दाच्या उल्लेखावरून इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर या शब्दाचा उल्लेख ज्या महसूल विभागाच्या आदेशावर आणि शासकीय कागदावर करण्यात आला आहे त्या महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत एमआयएमने थेट विभागीय आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.

इम्तियाज जलील यांच्या विरोधात 23 जून रोजी विविध संघटना मोर्चा काढणार असल्यामुळे त्या आधीच ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यावरून कोंडी करण्याचा प्रयत्न एमआयएमकडून केला जात आहे. संजय शिरसाट यांच्या राजकीय दबावातून आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारावा, अशी मागणीही केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT