Ashok Chavan, Bhaskarrao Patil - Khatgaonkar Sarkarnama
मराठवाडा

BJP Leader Bhaskarpatil Khatgaonkar News : मेहुणे खासदार झाले, दाजींचे काय ? भास्कर पाटील खतगांवकर काँग्रेसच्या वाटेवर ?

Jagdish Pansare

Nanded BJP Political News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या पंधरा दिवस आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत भास्कर पाटील खतगांवकर आपल्या समर्थकांसह चव्हाण यांंच्यासोबत गेले.आता मेहुणे-दाजीची ही जोडी भाजपमध्ये आहे. अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले, पण खतगावकरांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असतांना आता ते पुन्हा काँग्रेस मध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.

2021 मध्ये देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे भाऊजी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या घरवापसीमुळे देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापुरकर यांचा दणदणीत विजय झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. खतगावकर यांनी स्नूषा डाॅ. मिनल खतगावकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नही केले. पण पक्षाने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच विश्वास दाखवला होता.

मेहुणे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना पंधरा दिवसातच राज्यसभेवर संधी देण्यात आली. तेव्हापासून दाजी खतगांवकरांचे काय? असा प्रश्न त्यांचे समर्थक विचारू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह महायुतीला पराभवाचा फटका बसला. काँग्रेस महाविकास आघाडीने नांदेड ची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकत वसंतराव चव्हाण यांना दिल्लीत पाठवले.

मात्र आजारपणामुळे वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर आता विधानसभेबरोबर नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. (Congress) काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसला मातब्बर उमेदवार शोधावा लागणार आहे. हीच खरी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याची वेळ असल्याचे भास्कर पाटील खतगावकर यांच्या समर्थकांना आता वाटू लागले आहे.

काँग्रेस प्रवेशासंदर्भात खतगावकर यांची वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते. नायगाव विधानसभा मतदारसंघातून खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना उमेदवारीचा शब्द मिळाला तर येत्या दोन आठवड्यात खतगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यावेळी दोन माजी आमदारांसह आपल्या समर्थकांना सोबत घेऊन खतगावकर नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस मधून भाजप आणि आता भाजप मधून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत सुनबाई मीनल खतगावकर यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी भास्कर पाटील घरवापसीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे असून राजेश पवार हे तिथे विद्यमान आमदार आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले तर नायगाव विधानसभेच्या जागेवर काँग्रेसमध्ये प्रवेश करून भास्कर पाटील खतगावकर सुनेसाठी दावा करू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT