Chhatrapati Sambhajinagar News : माजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातून विशेष न्यायाधीश (खासदार/आमदार) तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश डी. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक पोलिस ठाण्यात 1 मार्च 2020 रोजी भादंवि कलम 504, 506 आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 3 (1) (आर) (एस) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादीनुसार, 29 फेब्रुवारी 2020 रोजी क्रांतीनगर सिग्नल परिसरात त्यांनी आपला नवीन पान टपरीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी हर्षवर्धन जाधव तेथे आले आणि त्यांनी ही टपरी आपल्या मोकळ्या जागे शेजारी का लावली? अशी विचारणा करून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप जाधव यांच्यावर होता. तसेच टपरीवरील ध्वज फेकून दिल्याचेही तक्रारीत म्हटले होते. खटल्या दरम्यान फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आपली साक्ष फिरवली. फिर्यादीने आपल्या साक्षीत सांगितले की, टपरी लावण्यावरून वाद झाला आणि एका व्यक्तीने शिवीगाळ केली, परंतु ती व्यक्ती हर्षवर्धन जाधव नव्हती.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारानेही जाधव यांनी शिवीगाळ किंवा धमकी दिल्याच्या घटनेला दुजोरा दिला नाही. दोन्ही मुख्य साक्षीदार फितूर झाल्याने आणि सरकार पक्षाला कोणताही ठोस पुरावा सादर करता न आल्यामुळे न्यायालयाने जाधव यांना ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ (संशयाचा फायदा) देत निर्दोष मुक्त केले.
तसेच न्यायालयाने जाधव यांचे जामीन बंधपत्र रद्द करण्याचे आदेश दिले असून, नियमानुसार त्यांना 15 हजार रुपयांचे वैयक्तिक बंधपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या तर्फे ॲड. एम. बी. बोरसे तर सरकारतर्फे विशेष सरकारी वकील एस. व्ही. मुंडवाडकर यांनी काम पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.