

TMC post election strategy : पश्चिम बंगालमधील पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या. पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक निकालावरून थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाच व्हिलन बनविले. आमचा निवडणुकीत पराभव झाला नाही, निवडणूक आयोगाच्या मदतीने आम्हाला हरविण्यात आले, असे म्हणत ममतांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी दोन महत्वाचे निर्णय जाहीर केले. निवडणुकीच्या निकालानंतर केरळचे काळजीवाहू मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सोमवारीच पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला. तर तमिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज राजीनामा दिला. त्यामुळे तुम्ही राजीनामा देणार का, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आल्या. त्यावर त्यांनी प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर दिले.
राजीनाम्यावर बोलताना त्या म्हणाल्या, नैतिकदृष्ट्या आमचा विजय झाला आहे. त्यामुळे लोकभवनमध्ये जाऊन राजीनामा देणार नाही. आम्ही निवडणूक हरलो नाही, निवडणूक आयोगाच्या मदतीने आमचा पराभव करण्यात आला. आमची लढाई भाजपविरोधात नव्हे तर निवडणूक आयोगाविरोधात होती. आयोगाने भाजपसाठी काम केले. आता पक्षाच्या सदस्यांसोबत पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. मी आता भाजपचे अत्याचार सहन करणार नाही. रस्त्यांवर ही लढाई लढेन, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
दुसरी मोठी घोषणा
ममता बॅनर्जी यांनी कोणतीही पोटनिवडणूक लढणार नसल्याची घोषणाही आज केली. आपण आता मुक्त पक्षी आहोत, असे सांगत त्यांनी इंडिया आघाडीला भाजपविरोधात एकजुट करणार असल्याचे सांगितले. मागील निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. मात्र, पक्षाला बहुमत मिळाले होते. त्यानंतर भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत मुख्यमंत्रिपद शाबुत ठेवले होते. याच मतदारसंघातून त्या आता पराभूत झाल्या आहेत.
भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी हे यावेळी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन मतदारसंघातून विजय मिळविला आहे. त्यांना एक मतदारसंघ सोडावा लागेल. या मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत ममतादीदी विधानसभेत जाऊ शकतात, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनीच आपण कोणतीही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करत त्यावर पडदा टाकला आहे.
घटनात्मक पेच?
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा दिला असता तर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत त्यांच्यावर राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली असती. मात्र, आता त्या राजीनामा देणार नसल्याने घटनात्मक पेच निर्माण होऊ शकते. तशीही त्यांच्या सरकारची मुदत ७ मे रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारचा कार्यकाळ त्यादिवशी संपुष्टात येईल. त्याआधीच राज्यपालही त्यांचे सरकार बरखास्त करू शकतात किंवा राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. त्यामुळे ममतांनी राजीनामा दिला नाही तरी पुढील सरकारच्या स्थापनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.