Abdul Sattar-Raosaheb Danve
Abdul Sattar-Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

सत्तारांकडून दानवेंना पुन्हा चकवा : भाजपचे सहापैकी चार नगरसेवक शिवसेनेत

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : सोयंगाव नगरपंचायत निवडणूकीत आमचे सहा उमेदवार अगदी कमी मताने पडले, नाहीतर भाजपला एकही जागा मिळू दिली नसती, असे विधान शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले होते. १७ पैकी ११ जागा जिंकत शिवसेनेने नगरपंचायत ताब्यात घेतली होती. (Shivsena) पण एवढ्यावर समाधान मानतील ते सत्तार कसले. भाजपच्या (Bjp) सहा नगरसेवकांवर त्यांचा डोळा होताच, आणि त्यांनी यापैकी चार नगरसेवकांना अखेर गळाला लावलेच.

नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच सत्तारांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा चकवा दिल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. शिवसेनेच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज नगराध्यक्ष पदी आल्याने शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला, तर भाजपकडे सूचक-अनुमोदकही नसल्याने त्यांना उमेदवारच देता आला नाही.

भाजपचे दोन नगरसेवक देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला जातोय. जर हे नगरसेवकही पक्ष सोडून गेले तर मात्र भाजपची नगरपंचायतीमधील पाटी कोरी होईल आणि हा पक्षाला मोठा धक्का असेल. राज्याचे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघावर आपली मजबूत पकड कायम राखण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे.

आपल्याला तालुक्यात विरोधकच राहू नये, यादृष्टीने सत्तार यांची राजकीय खेळी सुरू आहे. सोयगांव नगरपंचायत बहुमतासह ताब्यात घेतल्यानंतरही सत्तार यांनी भाजपचे चार नगरसेवक पक्षात खेचून आणले. तर उर्वरित दोघेही लवकरच पक्षात येतील, असे बोलले जाते. तर तिकडे भाजपने मात्र आमच्या नगरसेवकांना पैशाची आमिष आणि दबाव तंत्राचा वापर करत पक्षात येण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे.

आज नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. विरोधात अर्जच नसल्याने शिवसेनेचा नगराध्यक्ष बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. आता ७ फेब्रुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे.

आज शिवसेना गटनेत्याची देखील निवड करण्यात आली. या संदर्भातील प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे अक्षय काळे यांची नगर पंचायतीच्या गटनेते पदी सर्वानुमते निवड झाली. यावेळी भाजपचे नवनिर्वाचित सदस्य वर्षा घनगाव संदीप सुरडकर , ममताबाई इंगळे,आशियाना शाह हे चार सदस्य शिवसेनेच्या गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT