हिंगोली ः नांदेड-देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत खतगांवकर यांच्या घरवापसीमुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजपने आता निरनिराळे हातखंडे वापरायला सुरूवात केली आहे. खतगांवकर सोबत असते तर मी प्रचारालाही आलो नसतो, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोटनिवडणूक आपल्यासाठी अवघड झाल्याची कबुली दिली होती. मात्र त्यानंतरही आपण जोर लावणार आणि निवडणूक जिंकणार असा दावाही पाटील यांच्याकडून केला जातोय.
बुथप्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांना सर्व ताकदीनीशी मतदान करवून घेण्याचे आवाहन करतांनाच चंद्रकांत पाटलांनी एक अजब शक्कल लढवली आहे. बुथप्रमुखांमध्येच स्पर्धा लावून भाजपला जास्तीत जास्त मतदान करवून घेण्यासाठी चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या सागर बंगल्यावर जेवणाची संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी हिंगोलीतील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात केली.
बुथवरील एकूण मतदानाच्या ७० टक्के मतदान भाजपला मिळवून देणाऱ्या बुथप्रमुखांना फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांच्यासोबत जेवणाची संधी,आणि त्यांच्या सहीची एक शाल भेट दिली जाणार आहे. आता पाटील यांचा हा फंडा किती काम करतो हे लवकरच स्पष्ट होईल. चंद्रकांत पाटील हे आज हिंगोलीत भाजप बूथ संघटन कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करत होते.
काॅंग्रेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार टक्कर देण्याची तयारी सुरू केली होती. भाजपकडून देगलूर-बिलोलीत पंढरपूर पॅटर्नची पुनरावृत्ती करत महाविकास आघाडीला दुसरा धक्का देण्याचा दावा केला जात होता.
पण प्रचाराचा जोर वाढत असतांनाच भास्कर पाटील खतगांवकर यांनी पक्षांतर्गत नाराजीतून भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काॅंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देत महाविकास आघाडीपुढे तगडे आव्हान निर्माण केलेली भाजप आता बॅकफुटवर आली. पण तरीही भाजपने अजूनही आशा सोडलेल्या नाहीत.
भाजपच्या राज्य व केंद्रातील मंत्र्यांनी देखील पोटनिवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. बुथप्रमुख ही भाजपची सर्वात मोठी ताकद असल्याचे गेल्या अनेक निवडणुकांमधून सिध्द झाले आहे. त्यामुळे आता या बुथप्रमुखांनाच प्रोत्साहित करत विजयाला गवसणी घालण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी चालवले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून बुथप्रमुखांमध्ये त्यांनी लावलेली स्पर्धा आणि फडणवीसांसोबत जेवणाची संधी याकडे पाहिले जाते. आता फडणवीसांसोबत जेवण्यासाठी बुथप्रमुख किती जोर लावतात? भाजपला ते यश मिळवून देतात का? हे २ नोव्हेंबरच्या निकालानंतरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.